ठाणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाण्यातील चित्रकार सुमन दाभोलकरने आपल्या कलेच्या माध्यमातून चक्क दगडात नरेंद्र मोदी यांचे चित्र रेखाटले. सुमन दाभोलकर गेले काही वर्षे दगडात चित्र रेखाटून दगडांना जिवंत रूप देण्याचे काम करत आहे. या कलेच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी अनेक दिग्गजांची चित्रं दगडात साकारलेली आहेत. नद्यांमध्ये मिळणाऱ्या दगडांचा कोणताही आकार न बदलता सुमन स्टोन आर्ट करत असतात. त्यातच नदीमध्ये सापडलेल्या एका दगडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिम्मित स्टोन आर्ट साकरल्याचे यावेळी चित्रकार सुमन दाभोलकरने यावेळी सांगितले.
दगडांना जिवंत करण्याची कला
सध्याच्या जगात दगडांमधून मूर्ती घडवणे, दगडावर कोरीव काम करणे, निसर्गाच्या सानिध्यात बसून निसर्गाचं चित्र रेखाटणे किंवा जिवंत माणसाचे पोट्रेट तयार करणे या सर्व कला आपण पाहिल्याच आहेत. परंतु दगडांना जिवंत करणारी कलाही समोर आली आहे. नद्या, दऱ्या-खोऱ्यांमध्ये दगड पाहताच त्या दगडांमधून देखील सुंदर कलाकृती सादर होऊ शकते व त्या दगडांना देखील जिवंत करता येऊ शकते. ही संकल्पना आपल्या विचारांच्या बाहेरच आहे. परंतु अशाच दगडांना जिवंत करण्याची कला ठाण्यातील या कलाकाराने सादर केली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर या कलेला वाव मिळवून द्यायचा निश्चय
'कोरोना काळात गेल्या वर्षी गावी असताना आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून वेगळे काहीतरी करण्याचा संकल्प केला होता. नद्यांमध्ये सापडणाऱ्या दगडांवर चित्र रेखाटून त्या दगडांना जिवंत स्वरूप देण्याचा निश्चय केला. चित्रकलेच्या सरावातून मला ही कलाकृती सादर करता आली. चित्रकलेच्या माध्यमातून दगडांवर अशी कलाकृती रेखाटत असताना अशा प्रकारचा अनेक ऑर्डर देखील मिळत गेल्या. स्टोन आर्ट ही कला मी करत असताना अनेक कलाकारांपर्यंत मला ही कला पोहोचवायची आहे. तसेच भारताबाहेर जाऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरही या कलेला वाव मिळवून द्यायचा आहे. नवीन चित्रकार व कलाकार यांनी देखील अशा प्रकारचा निश्चय ठेवून नवनवीन कलाकृती सादर केल्या पाहिजेत', असे सुमन दाभोलकरने म्हटले आहे.
हेही वाचा - "डीसीपींच्या पोस्टिंगसाठी 'या' दोन मंत्र्यांना 40 कोटी दिले"; सचिन वाझेंचा धक्कादायक खुलासा