ठाणे - दिवसेंदिवस शिक्षणाचा प्रश्न जटील होत चालला आहे. त्यात पालक आणि विद्यार्थी भरडले जात असून सरकारने मात्र खासगी शाळांच्या फी वाढीस रान मोकळे करून दिल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. कल्याण येथील नारायणा स्कुल मध्ये शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढल्याचा गंभीर आरोप पालकवर्गाने केला आहे. या प्रकारमुळे एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण पश्चिम वसंत व्हॅली येथील नारायणा शाळेने अचानकपणे फी वाढविल्यामुळे पालक संतप्त झाले आहेत. शाळेने केलेली फी वाढ अन्यायकारक असून ती कमी करण्याची मागणी पालक वर्गाने शाळा प्रशासनाकडे केली आहे. त्यातच काल काही विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने वर्गातून बाहेर बोलवून लायब्ररीमध्ये बसवले. याबाबत विद्यार्थ्यांनी सायंकाळी पालकांना सांगितले. घडल्या प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला असता, फी न भरल्याने विद्यार्थ्यांना न बसू दिल्याचे उत्तर दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
हेही वाचा - सीबीएसईच्या १० वी, १२ वीच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ; जाणून घ्या किती भरावी लागणार 'फी'
प्रवेश घेताना, फी 3 वर्षे वाढणार नाही आणि वाढली तरी 5%च्या वर असणार नाही, असे शाळेच्या प्रशासनाने सांगितले होते. असे असताना 40% फी वाढवली गोली आहे. युनिफॉर्म, ट्रान्सपोर्ट, पुस्तके आणि इतर साहित्यातसुद्धा शाळा भरमसाठ लूट करते, असा आरोप पालकांनी केला आहे. याबाबाबत शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यात नकार दिला आहे.