नवी मुंबई : 16 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एका दिवसातील कोरोना बाधितांच्या संख्येने 300चा आकडा पार केला आहे. मागील तीन ते चार दिवसात कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत गेल्याचे दिसून येत आहे. ही बाब अत्यंत गंभीरतेने लक्ष देण्याची असून, कोरोना बाधितांच्या संख्येवर नियंत्रणासाठी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सतत हात धुणे या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन केले जाणे आवश्यक आहे.
मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता कोरोना सुरक्षा नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचे दिसून येत असून, अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. याकरिता प्रत्येक विभाग कार्यालयनिहाय पोलिसांसह दक्षता पथके नियुक्त करण्यात आली असून, त्यांच्यांमार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच पोलिसांमार्फतही स्वतंत्ररित्या कारवाई केली जात आहे.
विशेष दक्षता पथकांची 155 जणांची 31 टीम ठेवणार वॉच..
अभिजीत बांगर यांनी प्रत्येक पथकात 5 व्यक्ती, अशी 155 जणांची 31 विशेष दक्षता पथके कार्यान्वित करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पथक निर्मिती कार्यवाहीला तातडीने सुरूवात करण्यात आलेली आहे. ही विशेष पथके संपूर्ण महापालिका क्षेत्रातील कोविड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवणार आहेत. प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात सकाळी 1 व रात्री 1 अशी 2 पथके कार्यान्वित असणार आहेत. विभाग कार्यालय क्षेत्रासाठी नियुक्त पथकांव्दारे लग्न व इतर समारंभ तसेच वर्दळीची ठिकाणे येथे कोरोना नियमांचे पालन होते की नाही यावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.
एपीएमसी मार्केटमध्येही 5 पथके ठेवणार..
याशिवाय कोरोना प्रसाराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या एपीएमसी मार्केट क्षेत्रासाठी प्रत्येक पथकात 5 व्यक्ती अशी 5 पथके तिन्ही शिफ्टमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियम न पाळणा-या नागरिकांवर वॉच ठेवणार आहेत. अशाप्रकारे प्रत्येक शिफ्टमध्ये 5 याप्रमाणे 15 पथके एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणार आहेत.
एकूण 155 जणांचा समावेश असलेली ही विशेष दक्षता पथके कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काम करणार असून, दंडात्मक रक्कम वसूलीपेक्षा नागरिकांना कोविड सुरक्षा नियमांचे पालन करण्याची सवय लागणे हा पथके स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.