ठाणे - भक्षाच्या शोधात एक भलामोठा साप चक्क कल्याण पश्चिमेला प्रसिद्ध असलेल्या राम मारोती मंदिरात घुसला. विशेष म्हणजे काल शनिवारी या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, आज मंदिरातच सापाला पाहून भाविकांनी पळ काढला.
कल्याण पश्चिमेला दुधनाका लालचौकी परिसरात आहे. १०० वर्षांहून अधिक जुने राम मारोती मंदिर आहे. पूर्वी या परिसरात झाडेझुडुपे असल्याने मोठ्या प्रमाणात विविध जातीच्या विषारी, बिन विषारी सापांचा वावर होता. मात्र, परिसरात घरे झपाट्याने उभी राहिल्याने सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना रोजच घडत आहेत. कालही दुपारच्या राम मारोती मंदिरात आरती सुरू असतानाच एका भाविकाला जमिनीवर ठेवलेल्या देवांच्या फोटो मागे दडून बसलेला भलामोठा साप दिसला. त्याने लगेच मंदिरात साप घुसल्याची माहिती इतर भाविकांना दिली. यानंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शन घेणे सोडून बाहेर पळ काढला.
मंदिरात भलामोठा साप शिरल्याची माहिती सारंग केळकर यांनी सर्पमित्र हितेश यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंदिरात दडून बसलेल्या त्या सापाला पडकले. हा साप ६ फुटांच्यावर असल्याने या सापाला लगेच पकडून पिशवीत बंद करण्यात आले. हा साप धामण जातीचा असून वन विभागाच्या परवानगीने जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेश यांनी दिली.