ठाणे - श्रावण महिन्यातील पहिलाच सण नागपंचमीचा असतो. या दिवशी ठिकठिकाणी नागांची पूजा केली जाते. त्यातच शुक्रवारी नागपंचमीच्या दिवशी एका ठिकाणी नाग तर दुसऱ्या ठिकाणी साप आढळल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. यानंतर दोघांना सर्पमित्रांच्या सहाय्याने जीवदान देण्यात आले.
पहिली घटना -
शहाड परिसरात असलेल्या बिर्ला स्कुलच्या आवारात असलेल्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनाखाली शुक्रवारी दुपारच्या सुमाराला एक भलामोठा नाग होता. काही वेळाने एक व्यक्ती आपली दुचाकी घेण्यासाठी पार्किंगमध्ये आला असता, त्याला हा नाग दिसला. या नागाला पाहून त्याने इतरही लोकांना पार्किंगमध्ये नाग घुसल्याची माहिती दिली. त्यामुळे पार्किंगमधील वाहन घेऊन जाणारे नागरिक घाबरून लांब पळाले होते. यादरम्यान, सेंच्युरी कंपनीतील अग्निशमन दलात कार्यरत असलेले फायरमन सुमित टेंभे आणि संतोष भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या नागाला शिताफीने पकडले. हा नाग साडेपाच फूट लांब होता. तसेच तो इंडियन कोब्रा जातीचा होता. या नागाला वन विभागाची परवानगी घेऊन ज्येष्ठ सर्पमित्र दत्ता यांनी निर्सगाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले.
हेही वाचा - 16 वर्षीय मुलीला रात्रभर घरात डांबून बलात्कार.. आरोपीला सात वर्षे कारावासाची शिक्षा..
दुसरी घटना -
दुसऱ्या घटनेत आज सायंकाळच्या सुमारास कल्याण-पश्चिम भागातील उदय गॅरेजमध्ये एक मोठा साप घुसला होता. ही बाब लक्षात आल्यानतंर येथील कारागिरांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो साप घाबरून गॅरेजमध्ये असलेल्या खोलीत जाऊन अडगळीत जागेत दळून बसला. त्यांनतर गॅरेज मालकाने साप घुसल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोबे यांना दिली. सर्पमित्र यांनी घटनास्थळी येऊन या सापाला पकडले. हा साप धामण जातीचा तर ५ फूट लांबीचा होता. याही सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान देण्यात आले.