ठाणे - कल्याण पूर्वेत शेजारी राहणाऱ्या दोन गटात जोरदार धुमश्चक्री झाली. यावेळी झालेल्या ॲसिड हल्ल्यामध्ये 6 जण जखमी झाले आहेत. लहान मुलांमधील खेळण्याच्या वादातून दोन गटात हाणामारीचा प्रकार घडला असून ही घटना नेतीवली परिसरात गुरुवारी (दि. 5 नोव्हेंबर) दुपारी घडली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
कल्याण पूर्वेतील कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या नेतिवली परिसरात अबीद अन्सारी आणि रिंकू मंडल हे एकमेकांच्या शेजारी राहतात. या दोघांमध्ये एका घराच्या कब्जावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. बुधवारी (दि. 4 नोव्हेंबर) काही लहान मुले खेळत असताना अन्सारी आणि मंडल यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला. मात्र, हा वाद किरकोळ असल्याने या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. मात्र, या घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली नव्हती. परिमाणी गुरुवारी (दि. 5 नोव्हें.) अन्सारी आणि मंडल, अशा दोन गटात जोरदार हाणामारी सुरू झाली. या हाणामारीदरम्यान हल्ला करताना ॲसिडचा वापर करण्यात आला. हे ॲसिड अंगावर फेकल्याने मेहजबीन अन्सारी, ललिता विश्वकर्मा, टिंकू मंडल, रेणू मंडल आणि तब्बसूम अन्सारी आणि एक, अशा 6 महिला जखमी झाल्या. यात मेहजबीन व ललिता या जबर होरपळल्या आहेत.
जखमींवर कल्याणच्या रुक्मीमीबाई रुग्णालायत उपचार सुरू
या सगळ्या जखमींवर कल्याणच्या रुक्ख्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र, या दोन्ही गटांपैकी नेमके ॲसिड कुणी कुणावर फेकले याचा अद्याप छडा लागलेला नाही. त्यामुळे पोलीसही संभ्रमात आहेत. याचा छडा लावण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या ॲसिड हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे.
ॲसिड कुणी आणि कशासाठी आणले याचा शोध सुरू
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी कल्याणचे सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार म्हणाले, या प्रकरणात पोलीस चौकस तपास करत आहेत. ॲसिड कुणी आणि कशासाठी आणले याचा शोध सुरू आहे. पोवार यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन होरपळलेल्या महिलांची चौकशी वजा विचारपूस केली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - चोरी बेतली जीवावर; त्रिकुटाकडून बेदम मारहाणीत चोरट्याचा मृत्यू