ठाणे - काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवलीतील एका डॉक्टरला मूल विकल्याची घटना उघडकीस आली असतानाच असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन मुलांनंतर जन्मलेली मुलगी नकोशी झाल्याने भिवंडीतील मातापित्याने दलालांच्या मदतीने ( Parents in Bhiwandi Selling Girl ) तीचा दीड लाखाचा सौदा केला. विशेष म्हणजे या निष्ठुर मातेची सौदेबाजी सीसीटीव्हीत कैद ( Incident Captured on CCTV ) झाली आहे. याप्रकरणी सहा जणांना ( Six Arrested ) बेड्या ठोकल्या असून नवजात बालिकेला डोंबिवलीच्या जननी आशीष चॅरिटेबल ट्रस्टमध्ये ठेवण्यात आले आहे.
...म्हणून केला सौदा
भिवंडीत राहणारे वकील अन्सारी याची पत्नी मुमताज अन्सारी हिने 4 डिसेंबर रोजी भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र आधीच 1 मुलगा व 2 मुली असल्याने चौथी मुलगी नको म्हणून या दोघांनी आपली मुलगी दीड लाख रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी मुमताजची बहिण कायनात खान (30), भाऊ मुझम्मील (18) याच्यासह दलाल झीनत खान, वसीम शेख यांची मदत घेतली. मात्र याचा सुगावा ठाणे गुन्हे शाखेला लागता होता.
'असा' रचला पोलिसांनी सापळा
पोलीस अधिकारी व अंमलदारांनी बनावट खरेदीदार बनवून या बालिकेच्या खरेदीसाठी संपर्क केला. त्यासाठी त्यांना ठाण्यातील पॅसलमिल नाका येथील स्वागत हॉटेल येथे येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्ये सापळा रचला. त्यानंतर विक्रीसाठी आलेल्या अन्सारी व आरोपी माता मुमताजला दीड लाख रुपये देऊन नवजात बालिकेला ताब्यात घेताच पोलिसांनी सर्वांना आपल्या खाक्या दाखवत अटक केली आहे. तर मुलगी विक्री करत असतानाचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.