ठाणे - मीरारोडच्या रामनगर परिसरात मध्यरात्री सिलिंडरची स्फोट झाल्याची घटना घडली. एकापाठोपाठ सहा स्फोट झाले. रामनगरमध्ये मोकळ्या मैदानात भारत गॅस व एचपी गॅसचे सिलिंडर भरलेले दोन ट्रक उभे होते. यातील एका ट्रकमध्ये स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच. मीरा भाईंदर अग्निशामक दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आग आटोक्यात आणली. सिलिंडर फुटण्याचा आवाज पाच किलोमीटरपर्यंत ऐकू आला. सुदैवाने ही घटना मोकळ्या मैदानात घडल्याने मोठी हानी टळली.
राहिलेले सिलिंडर वाचवण्यात यश -
या स्फोटामध्ये एकजण जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी भक्तीवेदांत रुग्णालयात दाखल केले आहे. तर, आग विझवताना एक जवानाला किरकोळ दुखापत झाली. ट्रकमधील ९५ टक्के सिलिंडर वाचवण्यात मीरा भाईंदर अग्निशामक दलाला यश आले, अशी माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांनी दिली.
रात्री पाऊणे दोनच्या सुमारास राम नगर येथे सिलिंडर ब्लास्ट झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. तत्काळ आम्ही कर्मचारी घेऊन घटनास्थळी दाखल झालो. अग्निशामक विभागाला देखील याची माहिती दिली. नेमका हा स्फोट कशामुळे झाला, याची माहिती घेत आहोत, असे मीरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी सांगितले.