ठाणे - मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा आणि 27 वर्षीय तरुणाचा विवाह गुपचूप एका घरात संपन्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सजगतेमुळे नवरदेवासह 6 नातेवाईकांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सांगर्ली भागात घडली आहे. 30 जूनला एका घरात हे लग्न पार पडले असून मुलीचे वय फक्त 15 वर्ष, 3 महिने, 11 दिवस आहे. तर नवरदेव 27 वर्षांचा आहे, असे महाराष्ट्र अंनिस कायदा व्यवस्थापन विभागाच्या राज्य सहकार्यवाह आणि डोंबिवलीतील रहिवासी अॅड. तृप्ती पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विरोधी संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह अॅड. रंजना गवांदे (संगमनेर) यांना निनावी फोनद्वारे बालविवाहाची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती अंनिस कायदा व्यवस्थापन विभागाच्या राज्य सहकार्यवाह अॅड. तृप्ती पाटील (डोंबिवली) यांना दिली.
मुलगी ही अल्पवयीन असुन अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील रहिवासी आहे, अशी माहिती पाटील यांना मिळाली. त्यावर पाटील यांनी ताबडतोब मानपाडा पोलीस ठाण्यास कळवले. स्वत: अॅड. तृप्ती पाटील, अंनिसचे ठाणे जिल्हाप्रमुख प्रा. प्रवीण देशमुख यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन लग्न ठिकाणाचा शोध घेतला असता, अपेक्षित असलेले ठिकाण सापडले. मात्र, तोपर्यंत बालविवाह संपन्न झाला होता.
दरम्यान, पोलिसांनी बालविवाह पार पाडण्यासाठी जबाबदार असलेल्यांना ताब्यात घेतले. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 अंतर्गत गुन्हा नवरदेव सतीश, त्याचे वडील साहेबराव जाधव, आई शोभा जाधव यांच्यासह 6 जणांविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. कार्यकर्त्यांकडे संपूर्ण पत्ता व इतर माहिती नसल्यामुळे आम्हाला लग्नाचे ठिकाण शोधता आले नाही. अन्यथा बालविवाह रोखण्यात यश आले असते, असे अॅड. तृप्ती पाटील यांनी सांगितले.