ठाणे - जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील देवरुंग या गावात शेकडो घरातील गणपतींसह गौरींची एकसाथ विसर्जनाची मिरवणुक निघते. ही प्रथा गेल्या 71 वर्षानंतरही कायम आहे. गावातील विविध राजकीय पक्षांसह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही एक गाव आणि एकच शेकडो गणपती- गौरींची विसर्जनाची मिरवणूक काढली. यामुळे पंचक्रोशीत या गावातील ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.
हेही वाचा - पाच लाखांसाठी विवाहितेला जिवंत जाळले
गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हटले की गुलाल उधळत डीजेच्या तालावर बेधुंद नृत्य जणू आत्ताच्या काळातील गणेशोत्सवात समीकरण झाले आहे. मात्र, भिवंडी तालुक्यातील देवरुंग गावातील शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत एकाहत्तर वर्षापूर्वी टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्याचा संकल्प आजही टिकवून ठेवला आहे. कल्याण-पडघा मार्गावरील असलेल्या या गावात सुमारे दीडशेच्या आसपास घरांमध्ये गणपती-गौरीची प्रतिष्ठापणा करण्यात येते.
हेही वाचा - प्रकाश आंबेडकर-असदुद्दीन ओवेसी यांच्यात गुप्तबैठक
देवरुंग-बापगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या गावातील युवक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन पारंपारिक विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय एकाहत्तर वर्षांपूर्वी घेतल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दीपक केणे यांनी दिली. यावेळी गावातील विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेते या मिरवणूकीत वैचारिक मतभेद विसरुन सहभागी होतात. तसेच या विसर्जनाच्या मिरवणुकीत तान्या बाळासह ऐंशी वर्षांच्या आजी-आजोबाही हिरहिरीने सहभाग घेत असतात. ही मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने डोक्यावर लाकडी पाट ठेवून त्यावर गणपती आणि गौरींची मूर्ती घेऊन एका रांगेत विसर्जनासाठी ग्रामस्थ निघतात. त्यावेळी संपूर्ण गाव या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह गाणी गात सहभागी झाल्याचे दिसून येते.