ठाणे- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. त्यानुसार टिटवाळ्यातील सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्तांनी मंगळवारपासून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसा फलकही या ठिकाणी लावण्यात आला आहे.
हेही वाचा- जोतिबाची चैत्र यात्रा रद्द; कोल्हापूरातील मंदिर, मशीद, चर्चसुद्धा दर्शनासाठी बंद
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोनोचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्य शासनाकडून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील शासकीय, खासगी शाळा, महाविद्यालये, मॉल, खासगी शिकवणी, जलतरण व धार्मिक स्थळे या ठिकाणी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.
शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत गणपती मंदिर मंगळवार पासून बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर विश्वस्तांनी घेतला आहे. दुसरीकडे मंदिरात बाप्पांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना माघारी परतावे लागत आहे. तर याचा परिणाम येथील रिक्षाचालक व पूजा साहित्य विक्री व्यवसायांवर झाला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.