ठाणे : मागील काही दिवसांपासून ठाण्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिघडली असल्याचे चित्र पाहायला मिळते. हे शहर मुख्यमंत्र्यांचे शहर असून या शहरात होत असलेले गुन्ह्याचे प्रकार हत्या, रॉबरी यावर अंकुश मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणा सपशेल फेल झाली आहे, असे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. मटणाच्या दुकानावर आलेल्या आरोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोहेल शेख याचा पत्ता सांगत नाहीस, आता तुझे मर्डर करतो अशी धमकी देत मटणाचे दुकानदार फिर्यादी अशपाक युनूस शेख(२१) याच्यावर आरोपी सोहेल कुरेशी, आशिष जैस्वाल आणि त्यांच्या साथीदारांनी अशोक याच्यावर कोयत्याने हल्ला केला.
लाथाबुक्क्यांनी मारहाण : या हल्ल्यात बचावलेल्या फिर्यादीचा पाठलाग करून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात करण्यात आलेला आहे. पोलिसांनी आशिष जैस्वाल आणि करण चव्हाण यांना अटक केली आहे. पाच फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. फिर्यादी अशपाक युनूस शेख(२१) रा. मुन्सी चाळ, रूम नं ३३०, पोखरण रोड नं १ भीमनगर वर्तकनगर ठाणे याचे कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ढोकाळी टीएमसी शाळेच्या बाजूला मटणाचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी (१४ जून) बुधवारी रात्री ८-३० वाजण्याच्या सुमारास आरोपी सोहेल कुरेशी, आशिष जैस्वाल आणि त्यांचे ७ ते ८ सहकारी चार मोटारसायकल वरून मटणाच्या दुकानावर आले. सोहेल कुरेशी यांनी अशपाक याला शिवीगाळी केली.
कोयत्याने डोक्यावर वार : तू सोहेल शेख याचा पत्ता सांगत नाहीस, आता तुझीच मर्डर करतो अशी धमकी देत सोहेल सोबत आलेल्या आशिष जैस्वाल याने जवळील लोखंडी कोयत्याने अशपाक याच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो वाचला. दरम्यान अशपाकच्या दंडावर वार झाला. घाबरलेल्या अशपाक याने दुकानाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सोहेल कुरेशी आणि त्याच्या साथीदारांनी अशपाक याला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पोबारा केला. सदरचा गुन्हा हा गुरुवारी पहाटे ४-११ वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आला. कापूरबावडी पोलिसांनी आशिष जैस्वाल आणि करण चव्हाण या दोघांना अटक केली आहे. पाच फरारी आरोपींचा शोध सुरू आहे.
भर रस्त्यात थरार : ही सर्व मारामारीची घटना मोबाईलमध्ये टिपण्यात आली आहे. यामध्ये दोन गट एकमेकांना चांगलेच भिडल्याचे दिसून येत आहे. मात्र हा सर्व प्रकार सुरू असताना पोलीस काय करत होते? असा प्रश्न आता स्थानिक विचारू लागले आहे. शहरामध्ये सध्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती फारच गंभीर झाली आहे, याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिक सांगत आहेत.
हेही वाचा :