ठाणे - भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत ( Rahnal Gram Panchayat ) हद्दीतील २८३ कुटुंबावर आज बेघर होण्याची वेळ आलेली. रेल्वे प्रशासनाच्या आराखड्यात ही वस्ती येत असल्याने आज (मंगळवारी) या झोपड्या तोडण्याची कारवाई सुरू होती. मात्र श्रमजीवी संघटनेमुळे ( Shramjivi Union ) ही कारवाई टळली आहे. तर नारपोली पोलिसांच्या ( Narpoli Police ) पुढाकाराने आंदोलक आणि रेल्वे प्रशासन ( Railway Administration ) अशी चर्चा झाल्याने ही कारवाई टळली आहे. या वस्तीच्या पुनर्वसनाबाबत २००५ सालापासून श्रमजीवी पाठपुरावा करत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात गरिबांना बेघर व्हायची वेळ येते, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल? असा सवाल श्रमजीवी संघटनेने विचारला आहे.
पोलीस फौजफाट्यासह बुलडोझर घेऊन पोहचले होते अधिकारी
भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मण नगर, सावित्रीबाई फुले नगर या २८३ कुटुंबाची वस्ती गेले ३० ते ३५ वर्षांपासून आहे. भिवंडी रोड रेल्वे स्थानका जवळ ही वस्ती असल्याने ही झोपडपट्टी हटविण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. आज मोठ्या पोलीस फौजफाट्यात, बुलडोझर घेऊन अधिकारी कारवाईला येऊन ठेपले होते. मात्र लोकांची एकजूट आणि श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनामुळे कारवाई टळली आहे.
बेघर होणाऱ्या नागरिकांना पुनर्वसन प्रस्ताव
या बेघर होणाऱ्या नागरिकांना शासनाने १ एकर जमिनीत पुनर्वसन प्रस्ताव तालुक्यातून २००६ साली पाठविला आहे. जिल्हाधिकारी ठाणे यांनी २००८ साली राज्यशासनाला हा प्रस्ताव मंजुरी साठी पाठवला आहे. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गरिबांना याच्या घरातून बेघर केले जात आहे. हे दुर्दैवी असल्याचे यावेळी श्रमजीवी संघटनेने सांगितले. आज झालेल्या चर्चेनंतर २ महिने या कारवाईला मुदत वाढ मिळाली असून या दोन महिन्यात शासनाने या गरिबांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करत तसे न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. आजच्या आंदोलनात महिला पुरुष यांच्यासह लहान लहान मुलं देखील सहभागी झाले होते.