ठाणे - भिवंडी तालुक्यातील खरबाव येथील श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वेठबिगारी पाशात अडकलेल्या 7 वीटभट्टी मजुरांना मुक्त केले आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मजुरांना भिवंडीच्या तहसीलदारांनी मुक्तीचे दाखले देत पुनर्वसनाबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.
चंदर, मोतीराम, गणपत आणि राजू (सर्व रा. बोट्याच्या वाडी ता. मोखाडी) या 4 जणांना खरबाव येथील नरेश वैती नावाच्या व्यक्तीने पैसे देऊन कामासाठी बांधून घेतले होते. गावात काम नसल्याने हतबल झालेले या मजूरांना नरेश वैतीने नावाच्या त्यांच्या मालकाने जबरदस्तीने बयाणा दिला होता. त्यात चंदरला आधी 2 हजार, गणेशोत्सवा दरम्यान, 12 हजार आणि दिवाळीपूर्वी 2 हजार असे एकूण 16 हजार रुपये इतका बयाणा देण्यात आला होता. याचप्रमाणे इतर 3 कुटुंबांना देखील दिले होते. भिवंडीतील घारबाव गावात असलेल्या या 7 वेठबिगारांना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुक्त केले आहे. यासंदर्भात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - दिल्ली अग्नितांडव: २८ मृतांची ओळख पटली, इमारतीचा मालक, मॅनेजरही अटकेत
मुक्त करण्यात आलेल्यांची नावे - चंदर बरफ याच्या सह पत्नी शेवंती बरफ, मोतीराम जाधव, काशी मोतीराम जाधव, राजू बुधा वाघ, भरती राजू वाघ आणि प्रकाश गणपत बरफ (सर्व रा. गोमघर बोट्याची वाडी)
सर्व मजुरांना भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी हे सर्व वेठबिगार मुक्त झाल्याचे शाश्वती दिली. तसेच पुनर्वसनाचे दाखले दिले. तर फिर्याद दाखल झाल्यानंतर मजूरांना आपल्या मूळ गावी मोखाड्यात बोट्याची वाडी येथे पोहोचवण्यात आले. यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस उल्हास भानुशाली, नम्रता भानुशाली, युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद पवार, तालुका सचिव मोतीराम नामकुडा उपस्थित होते.
वीटभट्टी, दगड खदान इत्यादी ठिकाणी कामावर येणाऱ्या मजुरांना 4-5 महिने आधीच बयाना द्यायचा आणि त्यांना बांधील बनवायचे. तसेच मजुरांची इच्छा असो नसो त्याला ठरलेल्या तारखेस घरातून उचलून गाडीत टाकून आणायचे आणि 14- 16 तास थंडी, उन्हाचा विचार न करता राबवून घ्यायचे. अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी 1976 साली माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी एक कठोर कायदा केला होता. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा अंमल व्हावा या धर्तीवर "बंधबिगार पद्धत (उच्चाटन) अधिनियम-1976" हा कायदा पारित केला. मात्र, या घटनेमुळे आजही कायद्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.
हेही वाचा - कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर बॅगमध्ये महिलेचे डोके नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
....म्हणून ही बयाणा पद्धतच बंद करा - विवेक पंडित
वीटभट्टी किंवा अन्य मालकांना वाटत असेल आम्ही तर फक्त बयाणा देतो, मग ही कारवाई का? तर कायदाने असे बयाणा देऊन बांधून घेणे गुन्हा आहे. या मुळे आदिवासींना तात्पुरता गरजेचे पैसे मिळतात. मात्र, त्यातून त्यांची गुलामी सुरु होते. म्हणून ही पद्धत बंद करा, असे श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी सांगितले.
तर यापुढे वीटभट्टीवर संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या नियमित भेटी होतील. मजुरांना शक्यतो गावातच रोजगार देण्यात येईल आणि बाहेर काम केले तरी किमान वेतन, त्यांचे हक्क आणि सन्मान, त्यांच्या मुलांचे आरोग्य, शिक्षण, पोटभर अन्न मिळावे, हा आमचा प्राधान्यक्रम असल्याचेही ते म्हणाले आहेत. तसेच जर यानंतरही कुणी मजुरांना गुलाम केले तर गुन्हा दाखल होणार, मग त्यासाठी कुणीही संघटनेला दोष देऊ नये असेही पंडित म्हणाले.