ठाणे - रायगड जिल्ह्यातील तळेगाव येथील धनंजय राईस मिलच्या नावाने शहापूर येथील शासकीय गोदामात येणारा तांदूळ हा प्रत्यक्ष कर्नाटक राज्यातून येत असल्याचे रविवारी समोर आले आहे. या तांदळाच्या पूर्ण व्यवहारात मोठा आर्थिक गैरव्यवहार असून यात अनेक अधिकारी सहभागी असल्याचा संशय श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला भात मिलर्सला भरडाईसाठी शासन देते आणि त्यांच्याकडून त्याबदल्यात तांदूळ घेते. या संपूर्ण प्रक्रियेत होणारा गैरव्यवहार समोर आला आहे.
शहापूरच्या शासकीय गोदामात तांदूळ येणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रमोद पवार यांना मिळाली. ही माहिती मिळताच भिवंडी तालुका अध्यक्ष सुनील लोणी, मुकेश भांगरे अन्य सहकाऱ्यासह श्रमजीवी संघटनेच्या वतीने शनिवारी सायंकाळच्या सुमारास गोदामात धडक दिली. यावेळी याठिकाणी कर्नाटकची नोंदणी असलेला तांदळाने भरलेला आढळून आला, या ट्रकमध्ये 50-50 किलो तांदळाने भरलेल्या 500 बॅग्स आढळून आल्या. वाहन चालक मोहम्मद जफर याला संघटनेच्या कार्यकरत्यांनी विचारले असता हा सगळा तांदूळ कर्नाटक राज्यातील हुबळी येथील एका दलालामार्फत खरेदी केल्याचे त्याने सांगितले.
श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहापूरच्या शासकीय गोदामाचे कर्मचारी एस. भगत यांना विचारले असता त्यांनी हे तांदूळ रायगड जिल्ह्यातील धनंजय राईस मिल यांच्यामार्फत आल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात हे तांदूळ कर्नाटक राज्यातून आल्याचे निष्पन्न झाले. 11 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयानुसार तसेच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार बारदान कलर कोडींग बाबत नियमावली आहे. मात्र, त्याचा भंग करत प्लास्टिक बॅग्सचा सर्रास वापर करून हा तांदूळ काळ्याबाजारात विकण्यासाठी पोषक वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप प्रमोद पवार यांनी केला आहे.
तांदूळ भरडाई प्रक्रियेत क्विंटल भाताच्या एका लॉटला चाळीस रुपये प्रति क्विंटल दराने सोळा हजार रूपये शासनाकडून मिळतात तसेच गोदाम ते मिलपर्यत शासन किलोमीटर प्रमाणे शासन दरात वाहतूक भाडे दिले जाते, या भाताच्या मोबदल्यात हाच भात मीलिंग करून अथवा राईस मिल कडे असलेला तयार तांदूळ 400 क्विंटल भाताच्या मोबदल्यात 270 क्विंटल म्हणजे 67 टक्के तांदूळ देण्याचे बंधनकारक असते. या भागातील भात शेती करणाऱ्या शेतकऱ्याला हमीभाव आणि चांगला दर मिळावा तसेच शिधावाटप धारकांना ही चांगले तांदूळ मिळावे हे या प्रक्रियेचे उद्दिष्ट आहे. मात्र, या सगळ्या नियमाला हरताळ फासत महाराष्ट्राच्या रेशनिंग वर चक्क कर्नाटकचा तांदूळ देण्याचे काम केले जात आहे. प्लास्टिक बॅगमध्ये येणारा तांदूळ दिसताना पॉलिश केलेला दिसतो मात्र तो खाण्यात चांगला नसल्याच्या अनेक तक्रारी शिधाधारकांनी श्रमजीवी संघटनेकडे केल्या होत्या.
कोट्यवधीच्या तांदूळ घोटाळ्यात राईस मिल मालक आणि फेडरेशन यांच्या अधिकाऱ्याची आर्थिक मर्जी राखून होत असल्याचा आरोपही श्रमजीवी संघटनेने केला आहे. परिणामी स्थानिक मिलर्सना प्रामाणिक काम करूनही हे काम परवडत नाही. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील काम करण्यास तयार असणाऱ्या राईस मिलर्सचे खच्चीकरण करून अशा परजिल्ह्यातील राईस मिलच्या मालकांच्या तिजोऱ्या अधिकारी भरत असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे रायगडमधील धनंजय राईस मिलने पावणेदोन लाख क्विंटल भात फेडरेशनद्वारे खरेदी केला असताना त्याची मिलिंग न करता शासनाकडून मिळणारा लाखो रुपयाचा वाहतूक खर्च हडप केला असल्याचा आरोपही श्रमजीवी संघटनेने केला आहे.
दरम्यान, श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा घोटाळा बाहेर आणून याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी जयसिंग वळवी यांना माहिती दिली. त्यांनी पाठवलेल्या पुरवठा निरीक्षक शहापूर यांनी स्थळ पंचनामा केला. श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार यांचा तसेच कर्नाटकच्या ट्रकचालकाचा जबाब घेऊन सदर प्रकरणाबाबत वरिष्ठांना अहवाल देणार असल्याचे त्यानी सांगितले. शासकीय गोदाम आणि राईस मिलची मिलीभगत यामुळे रेशनवरील तांदळाचा काळाबाजार होत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी केला आहे. यापुढेही या घोटाळ्याचा पाठपुरावा आपण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.