नवी मुंबई - पनवेल कामोठे व कळंबोली शहरातील वाढते खड्डे व त्यातून होणारे अपघात हे नेहमीचेच झाले आहे. अनेक वेळा सिडकोला निवेदन देऊनही खड्डयांची स्थिती जैसे थे आहे. तसेच सद्यस्थितीत असणारी वाढती खड्डयांची समस्या व श्राद्धपक्ष असल्याचे सांगत मनसेच्या माध्यमातून श्राद्ध घालून सिडकोचा निषेध करण्यात आला. यावेळी सिडको विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई व पनवेलमधील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. त्याच अनुषंगाने आज (बुधवारी) कळंबोली परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यातच हे आंदोलन करण्यात आले.
पनवेल महापालिका क्षेत्रातील पूर्वीच्या सिडको वसाहतमधील कळंबोली कामोठे शहरात रस्त्यांवरील खड्डे प्रश्नांवरून आंदोलन, निषेध आणि आरोप-प्रत्यारोपाचे वारे पाहायला मिळत आहे. याच प्रश्नी मनसेने बुधवारी (आज) रस्त्यावर उतरत आंदोलन केले. सिडकोच्या माध्यमातून बहुतांश रस्ते विविध कामासाठी खोदले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्याचे काम सिडकोने कंत्राटदारांना दिले आहे. मात्र त्यांच्याकडून हे काम योग्य रितीने होत नाही. त्यामुळे दुचाकीचालकांचे किरकोळ अपघात होत आहेत. याबद्दल सिडकोला वारंवार निवेदन देऊन झाले. मात्र सिडकोचे अधिकारी दखल घेत नसून मूग गिळून गप्प आहेत, असे प्रतिक्रिया मनसेचे राहुल चव्हाण यांनी दिली आहे. तसेच जर रस्त्याची स्थिती सुधारली नाही तर मनसे स्टाइल आंदोलन करू, असाही इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
हेही वाचा - गंगापूर तालुक्यात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; अनेक गावांचा संपर्क तुटला