ठाणे - गेल्या साडेचार वर्षात ठाणे जिल्ह्यात भाजप-शिवसेनेचे स्थानिक नेतेमंडळी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत एकमेकांविरोधात निवडणूक लढले. तेव्हापासूनच भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी शिवसैनिकांवर जो अन्याय केला त्या अन्यायाविरोधात माझा लढा आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी पक्षातून केलेली हकालपट्टीही मला मान्य आहे. मात्र, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात बंड कायम असल्याची प्रतिक्रिया ठाणे ग्रामीण सह संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी दिली आहे. शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
भिवंडी लोकसभा मतदार संघातून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी काँग्रेसकडूनही उमेदवारी मिळविण्याचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न केला होता. मात्र, काँग्रेसकडून त्यांना नकार दिल्याने त्यांनी शिवसेनेतून बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे बुधवारी रात्री उशिरा शिवसेना भवनातून एक प्रसिद्धपत्रक जारी करण्यात आले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने म्हात्रे यांची शिवसेनेच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आहे. या हकालपट्टीमुळे सुरेश म्हात्रे यांच्या भिवंडी तालुक्यातील मानकोली नाका वरील कार्यलयात बाळ्यामामाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी धाव घेवून शिवसेनेच्या निर्णयावर संताप व्यक्त केला.
दरम्यान, सुरेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय मला मान्य आहे. मात्र, मात्र भिवंडी लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात बंड कायम असल्याचे सुरेश म्हात्रे यांनी सांगितले. तसेच पुढील भूमिका येत्या शुक्रवारी मांडणार' असल्याचंही सुरेश म्हात्रे यांनी ई टीव्ही भारत शी बोलताना सांगितले.