ठाणे - टिटवाळा शहरातील शिवसेना शाखा प्रमुख आणि भाजपच्या युवा पदाधिकाऱ्याच्या वाढदिवशी दोघांनीही तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. आता कल्याण तालुका पोलीस युतीच्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणारा का ? असा सवाल व्हायरल व्हिडिओमुळे उपस्थित झाला आहे.
शिवसेना भाजपचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेल्याचे नागरिक बोलत आहेत. वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याच्या घटना यापूर्वी कल्याण परिसरात घडल्या आहेत. त्यातच पुन्हा तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा केल्याची घटना 5 मे ला रविवारी सायंकाळी उघड झाली आहे. टिटवाळा शहरातील शिवसेना शाखाप्रमुख नजीब रईस आणि भाजपचा युवा पदाधिकारी मुन्ना रईस यांच्या वाढदिवशी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या दोघांनी कार्यकर्त्यांसमोर तलवारीने केक कापून "हम करे सो कायदा" या अविर्भावात वाढदिवस साजरा केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला आहे.
कार्यकर्त्यांसमवेत केक कापण्यासाठी रईस बंधूनी चक्क तलवार उगारत या तलवारीने केक कापला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. एकीकडे शस्त्र बाळगणे गुन्हा असताना केवळ सत्ताधरी पक्षाचे पदाधिकारी म्हणून कल्याण तालुका पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का ? असा सवाल नेटकऱ्यांमधून चर्चीला जात आहे.