ठाणे : रवींद्र परदेशी यांच्यावर चॉपरने हल्ला करण्यात आला. रूग्णालयात जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. ठाणे स्टेशन रोडवर मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमागे पूर्व वैमनस्येचा हेतू असल्याचा संशय ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जे एन रणवरे यांनी व्यक्त केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 302 (हत्या) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, गुन्हेगारांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
फेरीच्या धंद्यातून वाद : मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास रवींद्र परदेशी हे घरी परत जात होते. यावेळी दोघा जणांनी त्यांच्या डोक्यावर चॉपरने वार केल्याची माहिती मिळाली आहे. हल्ला झाल्यानंतर परदेशी यांना तातडीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी परदेशी यांना मृत घोषित केले आहे. फेरीच्या धंद्यातून वाद होऊन रवींद्र परदेशी यांची हत्या झाली असावी असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. ठाणे नगर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. रवींद्र परदेशी यांची नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदी नियुक्ती झाली होती, अशी माहिती मिळाली आहे.
डोक्यात वार करुन हत्या : रवींद्र मच्छिंद्र परदेशी यांची अज्ञात इसमाने चॉपरसारख्या धारदार हत्याराने डोक्यात वार करुन हत्या करण्यात आली आहे. यात पक्षाचा संबंध असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आलेला नाही, तर वैयक्तिक कारणाने खून झाल्याचे दिसून येत आहे. फेरीवाल्यांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे, अशी माहिती ठाण्यातील नगर पोली स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी दिली आहे.
ठाण्यात तणावग्रस्त परिस्थिती : रविंद्र परदेशी यांच्यावर ठाण्यातील जांभळी नाका येथील शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचा ठाण्यातील मुख्य बाजार पेठेत कटलरीचा व्यवसाय आहे. ते मंगळवारी रात्री आपले काम संपवून घरी जात होते. तेव्हा त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात रुग्णालय परिसरात गर्दी केल्याचे चित्र होते. या घटनेनंतर ठाण्यात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात ही धक्कादायक घटना घडली आहे.