नवी मुंबई - नवी मुंबईत कोणत्याही शाळांनी फी न भरल्याचे कारण देऊन विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवल्यास शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिला आहे.
माहिती देताना शिक्षण अधिकारी योगेश कडूस्कर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्यामुळे याचा फटका कित्येक नागरिकांना बसला आहे. सद्यस्थितीत रोजगार गेल्यामुळे व व्यवसायात मंदी आल्यामुळे कित्येक पालकांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. शाळा सुरू झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची सक्ती करू नये, असे शिक्षण मंत्र्यांचे आदेश असूनही काही शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात बसण्यास मज्जाव करत आहेत व ग्रुपमधून काढून टाकत आहेत. त्याचप्रमाणे फी भरण्यासाठी शाळांकडून विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड हानी होत आहे. शिक्षण विभागाने अशा शाळांना दणका देण्याचे ठरविले आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना फी संबधी माहिती वेबसाFटवर तसेच शाळेच्या दर्शनीय भागी लिहून ठेवण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षण विभागातील तक्रारींसंबधी एक समितीही स्थापन करण्यात येणार आहे. शिवाय ज्या शाळा फी न भरल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवतील त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल, असे शिक्षण विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.