ठाणे - आज महागाईच्या जमान्यात अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासह प्रत्येक वस्तुच्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडल्या आहेत. त्यातच सर्वसामान्याचे आवडते खाद्य म्हणून वडापावही १५ ते २० रुपयांना मिळतो. मात्र, असे असताना उल्हासनगर कॅम्प २ मधील एका दुकानात अवघ्या दहा रुपयाला एक साडी विक्री करण्यात येत आहे. फक्त दहा रुपयांत साडी मिळत असल्यामुळे गरजुंना याचा फायदा होत आहे.
पारंपरिक भारतीय वेशभुषा म्हटले की, महिला साडीलाच पसंती देतात आणि ती जर स्वस्तात मिळत असेल तर खरेदीसाठी महिलांची झुंबड उडते. उल्हासनगर शहरातील कॅम्प २ मधील रंग क्रिएशन या दुकानात १० रुपयाला एक साडी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. ५ जूनपासून या दुकानात दहा रुपयांना साडी विकली जात आहे.
याबाबत दुकानाचे मालक बालाजी साखरे उर्फ अश्विनी यांना विचारले असता, १० रुपयांत साडी ही सवलत फक्त दररोज सकाळी साडेदहा ते बारावाजे पर्यंत सुरू असते. सकाळच्या वेळी प्रथम येणाऱ्या दीडशे जणांना टोकन दिले जाते. त्यानंतर ही मंडळी चौथ्या माळ्यावर जाऊन साडीची खरेदी करतात. प्रत्येक महिलेला एकावेळी पाच साड्या दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ही तर आमची सामाजिक जबाबदारी-
१० रुपयांत साडी विकायला कशी परवडते? असे दुकान मालकाला विचारले असता त्यांनी सांगितले की, वर्षभर आम्ही ग्राहकांच्या जीवावर कमवत असतो. त्यामुळे वर्षभरातून एखादा महीना नाही कमावले तरी चालेल. गरजु लोकांना याचा फायदा मिळेल. ही आमची सामाजिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
प्रत्येक जून महिन्यात आम्ही अशाप्रकारे आमच्या ग्राहकांची सेवा करणार आहोत. उरलेले ११ महिने व्यवसाय केला जातो, त्याची परतफेड म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे दुकानात नवीन ग्राहक येतात. या साडीची मूळ किंमत १०० रुपये आहे. काही ग्राहक अन्य साड्यांची खरेदी करतात. त्यामधून हा तोटा भरून निघतो, असे दुकानदाराचे म्हणणे आहे. पहिल्या दिवशी तब्बल ७५० साड्यांची विक्री झाली असल्याचे त्यांनी सांगितले.