ठाणे - आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने संजय फाउंडेशनतर्फे चिपळूणमधील तिवरे गावात धरण फुटल्याने बेघर झालेल्या कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला आहे. चिपळूण तालुक्यातील तिवरे गावात धरण फुटल्याने अनेक कुटुंबांना आपले सर्व काही गमवावे लागले आहे. त्यांच्याकडे काहीही शिल्लक नाही, अशी भयंकर स्थिती निर्माण झाली आहे.
धरण फुटल्याने बेघर झालेल्या कुटुंबांना आमदार संजय केळकर यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी संजय फाउंडेशनच्या माध्यमाने तेथील १५ कुटुंबांसाठी भांडी, ब्लँकेट्स, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू पाठविल्या आहेत. संजय फाउंडेशनने तिवरे गावातील कुटुंबांना मदत मिळावी या करिता नागरिकांना आणि संस्थाना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार ठाण्यातील वर्तकनगर साई मंदिर समितीने ब्लँकेट व चादर संजय फाउंडेशनला दिली. तसेच ज्ञानदीप ट्रस्ट, मुंब्रा मार्फतही या कुटुंबांना मदत करण्यात आली.
यावेळी आमदार केळकर यांनी संजय फाउंडेशनमार्फत नागरिकांना व सामाजिक संस्थाना तिवरे गावाला आपण सर्वांनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले आहे.