ठाणे - डोंबिवलीतील केमिकल लोचा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एमआयडीसी फेज १ मधील काही कंपन्यांचा शेडवर ऑईल मिश्रित पाऊस पडल्याची अफवा पसरल्याने रविवारी काही काळ या भागात खळबळ पसरली होती. शेडवरून पाईपाद्वारे जे पावसाचे पाणी येते त्यातून ऑईल मिश्रित पाणी येत असल्याचे काहींचे म्हणणे होते. त्यानुसार शेडवर पाहणी केली असता तेथेही ऑईल मिश्रित पाणी आढळले.
या घटनेबाबत एमपीसीबी अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता रविवारी सुट्टी असल्याने संपर्क होऊ शकला नाही. जून २०१४ मध्ये गाजलेल्या हिरव्या पावसानंतर डोंबिवलीत पुन्हा केमिकल लोचा झाल्याचे चव्हाट्यावर आले आहे. डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज १ भागात हिरवा पाऊस पडला होता. हा पाऊस पडून गेल्यानंतरही हिरव्या रंगाचे अवशेष जमिनीवर दिसून आले. अनेकांना हा रंग पाहून हिरवा रंग कुणी टाकला असावा?, असा संशय येत होता. मात्र, एमआयडीसी भागात सर्वत्र हा रंग दिसून आला. डोंबिवलीत एमआयडीसीची प्रदुषणाची टक्केवारी कुठपर्यंत गेली आहे, याची कल्पना यावरून येते.
हेही वाचा - डोंबिवलीच्या रस्त्यांची अवस्था ६० वर्षांआधी होती त्यापेक्षा दयनीय; पंडित हृदयनाथ मंगेशकरांची टीका
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही त्यावेळी बोलावण्यात आले होते. मात्र, रस्त्यावरचे हिरव्या रंगाचे दृश्य पाहून अधिकारीही अवाक झाले होते. मात्र, हिरव्या रंगाचा पाऊस अनेकांना धडकी भरवणारा ठरला होता. डोंबिवलीत प्रदूषण नियंत्रणासाठी काय करता येईल, यावर फक्त विचारमंथने करण्यात आली. हिरव्या पावसाच्या घटनेनंतर आता तेलाचा पाऊस पडला. या पावसाच्या घटनेची अभ्यासपूर्ण चौकशी करून पहावे लागेल, असे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांचाशी संपर्क केला असता त्यांनी सदर घटनेची चौकशी करणार असल्याचेही नलावडे यांनी सांगितले.