ठाणे - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाचा प्रस्ताव त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी विधीमंडळात मांडला. मात्र, सावरकरांविषयी अवमानकारक आणि घृणास्पद वक्तव्ये करण्यात आली. देशासाठी सावरकरांचे असलेले योगदान हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. सत्तेसाठी हपापलेल्या लोकांमध्ये सावरकरांचे विचार समजण्याची कुवत नसल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.
ठाण्यात सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित 'अथांग सावरकर' या कार्यक्रमासाठी दरेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना दरेकर म्हणाले, सावरकरांचे विचार समजण्याची कुवत सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. त्यांचे विचारांचा सन्मान करण्याची क्षमता सध्याच्या भाजप सरकारमध्येच आहे. सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा - सुप्रिया सुळे झाल्या वृत्त निवेदिका; उपमुख्यमंत्री अजित पवारांची दिली बातमी
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सिडकोचा अडीच हजार रुपये कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा कॅगचा अहवाल आहे. मात्र, सिडकोमध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार झालाच नाही. सत्ताधारी आपले घोटाळे लपवून ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत, असेही दरेकर म्हणाले.
महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीबाबत आपण समाधानी नाही. भाजप सरकारने २ लाखांचे कर्ज आणि २५ हजाराचा इन्सेन्टिव्ह दिला होता. नवीन कर्जमाफीनुसार २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तर ते माफ नाही. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले, हे तपासण्याचे आव्हान दरेकरांनी दिले.
याच कार्यक्रमादरम्यान अभिनेता शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. या कार्यक्रमाला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमैया, अभिनेता शरद पोंक्षे, भाजप आमदार आणि ठाणे शहर भाजप अध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.