ठाणे - दोहा येथे नुकत्याच झालेल्या अशियाई शुटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नेमबाजी प्रकारात रुद्रांश पाटील या 15 वर्षीय नेमबाजाने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत सुवर्ण पदकावर नाव कोरले. तसेच त्याच्या चमूनेसुद्धा एअर रायफल या प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे. सध्या 2024 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले असल्याचे, त्याने सांगितले.
हेही वाचा - 'दंगल गर्ल' अडकली विवाहबंधनात, सात ऐवजी घेतले आठ फेरे!
रुद्रांशने यंदा आशियाई स्पर्धेबरोबरच अन्य अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुद्धा 4 पदके पटकावली आहेत. हिरानंदानी फाउंडेशन शाळेच्या या विद्यार्थ्याने झेक रिपब्लिक आणि जर्मनी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वैयक्तिक आणि सांघिक विभागात सुवर्ण आणि रजत अशा दोन्ही प्रकारची पदके पटकावली.
'सध्या माझं लक्ष्य 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा आहे. यंदा मी वरिष्ठ गटात खेळत नसल्याने ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकलो नाही मात्र येणाऱ्या स्पर्धेची तयारी जोरदार सुरू केली आहे. आणि नक्कीच भारतासाठी चांगली कामगिरी करेन' असा विश्वास रुद्रांशने व्यक्त केला आहे.
रुद्रांश हा ठाण्यात हीरानंदानी फाउंडेशन स्कूल मधे 10 वी मध्ये शिक्षण घेत असून त्याला शाळेकडून चांगले सहकार्य मिळत असते. त्याची आई हेमांगिनी पाटील या नवी मुंबई आरटीओमध्ये उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत तर वडील हे ठाणे पोलीस दलात पोलीस उपायुक्त आहेत.
हेही वाचा - बीसीसीआयमध्ये सौरव गांगुलीचा कार्यकाळ वाढणार?