ठाणे - खासगी कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांची लूट पाहून शिवसेना नगरसेवकाने संतप्त होऊन अवाजवी बिल आकरणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर रुग्णालय प्रशासन उडवाउडवीची उत्तर दिल्याने त्यांनी चक्क पीपीई किट घालून रुग्णाला उचलून रुग्णालयाच्या बाहेर आणल्याची खळबळजनक घटना कल्याण पूर्वेतील एका खासगी रुग्णालयात घडली. विशेष म्हणजे 10 दिवसात पीपीई किटच्या 50 हजारांसह रुग्णालयीन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीचा खर्चही खासगी रुग्णालयाकडून रुग्णाच्या माथी मारला जात होता. मात्र, नगरसेवकाने दाखवलेल्या धाडसानंतर रुग्णालय प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत बिल कमी केले.
कोरोना काळात रुग्णाची लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांना कल्याण डोंबिवली पालिकेने तंबी दिली आहे. मात्र, तरीही काही खासगी रुग्णालयांकडून लूट सुरुच आहे. याचप्रकारे कल्याणमधील एका खासगी रुग्णालयानेही अवास्तव बिल आकारल्याचे समोर आले आहे. 10 दिवसांच्या फक्त पीपीई किटचे शुल्क चक्क 50 हजार रुपये आकारले आहे. इतकेच नव्हे तर रुग्णालयातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा खर्चही रुग्णाच्या माथी मारला. त्यामुळे बिलाचा फुगलेला आकडा पाहून रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडे धाव घेतली.
हेही वाचा - एकनाथ खडसेंना 'महावितरण'चा झटका; पाठवले 1 लाख 4 हजारांचे वीजबिल
नगरसेवक गायकवाड यांना बिलाबाबत संशय आल्याने त्यांनी थेट रुग्णालय गाठले आणि रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. यामुळे संतापलेल्या गायकवाड यांनी रुग्णालयाला धारेवर धरत अवाजवी आकरलेले बिल कमी करण्याची मागणी केली. या रुग्णाला दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, बिल भरल्याशिवाय रुग्णाला सोडण्यास रुग्णालयाने नकार दिल्याने संतप्त गायकवाड यांनी चक्क पीपीई किट परिधान केले आणि थेट रुग्णाचा वॉर्ड गाठत स्वतः रुग्णाला उचलून खाली आणले.
त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर रुग्णालय प्रशासन नरमले आणि बिल कमी केले गेले. याबाबत नगरसेवक महेश गायकवाड यांनी सदर प्रकार धक्कादायक आहे. सर्वसामान्य नागरिक आधीच कोरोनामुळे धास्तावेलेले असताना आता रुग्णालयाकडून लूट सुरू आहे. पीपीई किटसह आता चक्क रुग्णालयीन कचरा विल्हेवाट लावण्याचा खर्चही रुग्णाच्या माथी मारला जात आहे. हे अन्यायकारक आहे. याबाबत पालिका आयुक्त तसेच पालकमंत्र्यांची भेट घेत अशा मुजोर रुग्णालयावर कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता गुरुवारी रुग्णासह राजकीय कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीनुसार बिल कमी केले होते. आमच्याकडे कोणतीही तक्रार नाही, असे म्हणत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.