ठाणे Thane News : ठाण्यातील रस्ते दुरुस्तीची कामं अंतिम टप्प्यात आली असली तरी ठाण्यातून बाहेर जाणाऱ्या महामार्गाची स्थिती मात्र दयनीय झालीय. रस्त्यावर वाढलेली वाहनांची बेसुमार संख्या, रस्त्यावर स्ट्रीट लाईटचा अभाव आणि रस्त्यातील धोकादायक चढ-उतार यामुळं वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळं जीवघेण्या अपघातांची संख्या पाहिली की शहरातील रस्ते मृत्यूचे सापळे तर बनले नाहीत ना, असा प्रश्न निर्माण होतो. ठाण्यात सर्वाधिक अपघात होणारी 25 ठिकाणे असून त्यात 37 ब्लॅक स्पॉटचा समावेश आहे. वाहतूक विभागानं केलेल्या उपाययोजनांमुळं ब्लॅक स्पॉटची संख्या कमी झाली असली तरी अपघाताची मालिका सध्या सुरूच आहे.
अपघात संख्येत वाढ : 2022 ला जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 774 अपघात झाले. यात 185 अपघात गंभीर स्वरूपाचे होते. त्यात 197 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर दुसरीकडे 349 अपघातांमध्ये 414 जण जखमी झाले होते. त्याच्या तुलनेत 2023 मध्ये अपघाताच्या घटनांमध्ये 111 ने वाढ झालीय. सुदैवानं भीषण अपघातांची संख्या मात्र 12 ने कमी झाली आहे. या व्यतिरिक्त किरकोळ अपघातांची संख्या वाढली असून जखमी होणाऱ्यांची संख्या 24 ने घटली आहे.
ब्लॅक स्पॉट्सच्या ठिकाणी अपघात क्षेत्राचे बोर्ड लावण्यात आले असून जिथे साईड पट्टे नाहीत तिथे साईड पट्टे मारण्यात आले आहेत. तसंच अनेक रस्त्यांची डागडुजी केली गेली असून रस्त्यांवर वेग कमी करणारे स्पीड ब्रेकर बसवण्यात आलेत. या उपायोजनांमुळे अपघातांची संख्या यापुढे कमी होत जाईल - डॉ विनयकुमार राठोड, उपायुक्त,वाहतूक शाखा
ब्लॅक स्पॉटची संख्या कमी : तीन वर्षात किमान पाच अपघात झाले असा कोणताही पाचशे मीटरचा रस्त्याचा भाग हा 'ब्लॅक स्पॉट' म्हणून ओळखला जातो. ठाणे वाहतूक विभागाच्या क्षेत्रात असे 37 ब्लॅक स्पॉट होते. हे ब्लॅक स्पॉट कमी करण्याचे मोठे आव्हान वाहतूक विभागासमोर होते. सर्वाधिक अपघात होणाऱ्या दहा ब्लॅक स्पॉट्सची निवड करून तिथे असलेल्या त्रुटी कमी करण्याचं आव्हान वाहतूक विभागानं स्वीकारलं आणि त्या अनुषंगाने केलेल्या उपायोजनामुळं आता ही संख्या 25 वर आली आहे.
'या' ठिकाणी होतात सर्वाधिक अपघात : ठाण्यातून राज्य आणि राष्ट्रीय असे दोन्ही महामार्ग जात असून त्यावरच सर्वाधिक ब्लॅक स्पॉट्स असल्याने त्याची अवस्था फारशी समाधानकारक नाही. राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मानकोली नाका, दिवानाका, खारेगाव उड्डाणपूल, पिंपळस फाटा, रांजनोळी नाका, शिळफाटा, तीन हात नाका, नितीन कंपनी इत्यादी ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात. त्यासोबतच राज्य महामार्ग असलेल्या माजिवडा, ब्रह्मांड सिग्नल, गायमुख, ओवळा सिग्नल, वाघबीळ, कोपरी उड्डाणपूल, कल्याण फाटा रेतीबंदर येथे देखील अपघातांची संख्या मोठी असून उपायोजना करण्याची गरज आहे. एकीकडे ब्लॅक स्पॉट ठरलेल्या या रस्त्यावर गेल्या 11 महिन्यात 78 अपघातांमध्ये 39 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर दुसरीकडे याच कालावधीत गेल्यावर्षी 104 अपघातात 54 जणांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा -