ठाणे - सलग २ दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण - नगर महामार्गावरील रायते पुलाच्या जोड रस्त्याचा भाग खचला आहे. तर पुलाचे लोखंडी कठडे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. यामुळे सकाळपासून या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
मुंबईसह, कोकणात २ दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सगळे रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे कल्याण - नगर महामार्गावरील रायते पुलाच्या जोड रस्त्याचा भाग खचला आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प केली असून, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. पर्यायी रस्ता म्हणून अंबरनाथ मार्गाचा वापर वाहनचालक करत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. मात्र, हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने मुरबाडकडे आणि मुरबाडहून येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.