ठाणे - जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे रिक्षाचालक हा सार्वजनिक शौचालयात प्रातविधीसाठी गेला असता, त्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींकडून त्याची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या (Rickshaw driver killed) केली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील उंबर्डे गावात घडली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात (Khadakpada Police Station) अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरु केला आहे. अभिमान भंडारी (51) (Abhiman Bhandari) असे रिक्षाचालकाचे नाव आहे.
- मारेकरी बसले होते दबाधरून -
कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात रिक्षाचालक अभिमान भंडारी हे कुटूंबासह राहत होते. त्यातच आज शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास नेहमी प्रमाणे घराबाहेर असलेल्या गावातील सार्वजनिक शौचालयात गेले होते. त्यावेळी दबाधरून बसलेल्या कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या करून तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिमान यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर अभिमान यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी करीता केडीएमसीच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.
- हत्येचे कारण गुलदस्त्यात -
मारेकऱ्यांच्या मागावर तीन पथके तपासासाठी रवाना करण्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान ही हत्या आर्थिक वा कौटुंबिक वादातून या अशा कोणत्या कारणामुळे झाली असावी, असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत.
हेही वाचा - cousin Murder : अर्ध्या एकर शेतीच्या वादातून दगडाने ठेचून चुलत भावाची केली हत्या