ठाणे : एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कांबे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर घडली. या जीवघेणा हल्ल्या प्रकरणी हल्लेखोर मुलासह त्याच्या आई-वडिलांवर निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा वैभव सुरेश पालकर (३९) ,वडील सुरेश बाळकृष्ण पालकर, आई लता सुरेश पालकर अशी गुन्हा दाखल झालेल्या मायलेकांची नावे आहेत. तर वैभव पालकर यास पोलिसांनी (आज ) शनिवारी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
माहिती अधिकारामुळे झाला हल्ला : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष सीताराम रापटे (६७) हे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पोलीस दलात कार्यरत होते. काही वर्षांपूर्वीच ते पोलीस विभागातून सेवानिवृत्त झाले आहे. दरम्यान त्यांनी भिवंडी तालुक्यातील कांबे ग्रामपंचायतीत नातेवाईकाला घरकुल मिळवून देण्यासंबंधी माहितीचा अधिकार मागवला होता. हीच माहिती घेण्यासाठी शुक्रवारी २१ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास आले होते. त्यावेळी सदर माहीतीच्या अधिकारातील माहिती आरोपीच्या विरोधात असल्याने त्याचा राग मनात धरून हल्लेखोर होते.
डोक्यात घातला राॅड : त्यातच रिटायर पोलीस अधिकारी सुभाष रापटे हे कांबे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर शुक्रवारी २१ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास आले असता, त्यांच्या पाठीमागून येवून हल्लेखोर वैभवाने 'तुला आज ठारच मारतो' असे बोलून लोखंडी रॉडने रापटे यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्याला यावेळी जबर दुखापत झाली. रापटे हे ग्रामपंचायत कार्यलयाबाहेर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले असतानाच, हल्लेखोर वैभवच्या आई वडिलांनी घटनास्थळी येवून त्यांनी शिवीगाळ केली.
हल्लेखोरांवर गुन्हा दाखल : विशेष म्हणजे हल्लेखोर, जखमी सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यामध्ये सदरचा वाद २०१७ पासून सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या जीवघेण्या हल्ल्या प्रकरणी हल्लेखोर माय लेकांवर निजामपूरा पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०७ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक दीपक शेलार करीत आहेत.