ठाणे : भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायत हद्दीत ( Khoni Gram Panchayat in Bhiwandi taluka ) असलेल्या दाभाड पाडा या आदिवासी पाड्यातील ( Residents of Dabhad Pada ) नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण ( face many problems ) करावी लागत आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीकडून पाड्यात पाणीपुरवठा करणाऱ्या सुविधा दिली जात असतानाही अनेक महिन्यांपासून या ठिकाणी पाणी येत नसल्याने महिलांना हंडाभर पाणी आणण्यासाठी तीन किलोमीटर पायपीट करत असल्याचे भयाण वास्तव समोर आले. शिवाय पाड्यात नागरी समस्यांचा डोंगर उभा राहिल्याने या पाड्यातील आदिवासी नागरिक नागरी सुविधांपासून वंचित असल्याचे दिसून आले.
नागरिकांना अनेक समस्या : दाभाडपाड्यामध्ये जवळपास 300 हून अधिक आदिवासी नागरीक राहत असून या नागरिकांना पाण्यासाठी दारोदारी भटकावे लागत आहे. आदिवासी असल्याने या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप या आदिवासी महिलांनी केला आहे. भिवंडी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या आदिवासी पाड्यावर पाण्यासाठी सरकारकडून विविध योजना अंतर्गत बोअरवेल व नळ जोडणी करण्यात आले. परंतु त्या बोरवेल आणि नळांमधून पाणीच येत नसल्याची माहिती या आदिवासी महिलांनी दिली आहे. केवळ शासनाचा निधी लाटण्यासाठी या सुविधा पुरविण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
शासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप : या आदिवासी पाड्यात आजपर्यंत शौचालय सुद्धा बांधण्यात आले नसल्याची खंत महिलांनी व्यक्त केली आहे. तर काही महिलानी ग्रामपंचायतीचे सदस्य या मूलभूत प्रश्नकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक आदिवासी महिलांनी केला आहे. या समस्यांच्या वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायती आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ग्रामपंचायतीकडे शासनाचा निधी उपलब्ध असूनही ठेकेदार नेमण्यावरून अनेक नागरी कामे अडकून पडले असल्याची माहिती समोर आली आहे. आदिवासी महिलांना व शालेय विद्यार्थिनींना शौचालयासाठी सुद्धा व्यवस्था नसल्याने रात्रीच्या अंधारात जंगलामध्ये उघड्यावर जावे लागते. मात्र, जंगलात सापांसह विंचूची भीती असल्याने पाड्यातील शौचालय बांधण्याची मागणी या आदिवासी महिलांनी केली आहे.