ठाणे - एमआयडीसी आणि महावितरण यांचे कधी जमतच नाही, याचा प्रत्यय डोंबिवलच्या निवासी विभागातील सुदर्शननगरमध्ये पहावयास मिळाला. या भागातील काही सोसायट्यांना जोडणाऱ्या जलवाहिनीचे काम करताना एमआयडीसीच्या कंत्राटदाराने जेसीबीने उचकटून महावितरणची विद्युत वाहिनी तोडल्याने या परिसरातील रहिवाशांच्या रोषाला दोन्ही प्रशासनांना सामोरे जावे लागले.
आजदे गावात येणाऱ्या साईबाबा मंदिर रस्त्याजवळ असलेल्या सुदर्शन नगरमधील घर तसेच आसपासच्या सोसायट्यांना मागील अनेक महिन्यांपासून पाण्याच्या तुटवडा भासत होता. वारंवार तक्रारी करुनही एमआयडीसी प्रशासन काही केल्या लक्ष देण्यास तयार नव्हते. सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर उर्फ नंदू ठोसर यांनी हा प्रकार एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिला. त्यानंतर एमआयडीसीने जलवाहिनीचे काम हाती घेतले. एमआयडीसीच्या कंत्राटदाराने जेसीबीच्या सहाय्याने रस्ता उकरून नवीन जलवाहिनीचे काम केले. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळाला.
मात्र, दुसरीकडे या कामावेळी रस्त्याखालून गेलेी महावितरणची केबल तुटली होती. गुरुवारी रात्रीच्या सुमारास तोडलेल्या ठिकाणी ठिणग्या उडून धूर येऊ लागला. त्यामुळे महावितरणने तत्काळ विद्युत पुरवठा खंडित केला. नंतर साडेचार तसांनी विद्युतपुरवठा पूर्ववत झाला. ज्या ठिकाणी विद्युत वाहिनी खंडित झाली त्याठिकाणी महावितरणच्या कंत्राटदाराने शुक्रवारी (दि. 16 ऑक्टोबर) सकाळी 8 ते10 फुटाचा केबलचा तुकडा आणून जोडकाम सुरू केले. मात्र, हा प्रकार पाहून जमलेल्या त्रस्त रहिवाशांनी ही केबल सलग जोडण्याचा हट्ट धरला होता. घटनास्थळी आलेल्या महावितरणचे उपअभियंता सचिन दळवी यांनी संतापलेल्या रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रहिवाशांनी कमजोर झालेल्या विद्युत वाहिनीला केबलचा तुकडा जोडल्यास पुन्हा तीच समस्या नजीकच्या काळात उद्भवण्याची शक्यता असल्याची जाणीव उपअभियंता दळवी यांना करून दिली. अखेर कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांनी केबल उपलब्ध होताच त्याच ठिकाणी सलग केबल टाकली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर सदर कंत्राटदादाराच्या मजुरांनी उपलब्ध असलेल्या केबलच्या तुकड्याने जोडकाम केले.
एमआयडीसीच्या कंत्राटदाराला बसणार भुर्दंड
सोसायट्यांना जोडणाऱ्या जलवाहिनीचे काम करताना जेसीबीने उचकटून महावितरणची विद्युत वाहिनी तोडणाऱ्या एमआयडीसीच्या कंत्राटदाराला भुर्दंड बसणार आहे. काम करताना केवळ हलगर्जीपणा केल्यामुळे या परिसरातील ग्राहकांना वीज सेवेपासून वंचित ठेवल्याबद्दल महावितरणने एमआयडीसीच्या संबंधित कंत्राटदारावर कारवाईचा बडगा उगारला आहे. यासाठी यांनी उपकार्यकारी अभियंता नितीन ढोकणे यांच्यामार्फत नुकसानभरपाई संदर्भात एमआयडीसीला तसे पत्र धाडल्याचे उपअभियंता सचिन दळवी यांनी सांगितले.
हेही वाचा - देहव्यापार करणाऱ्या 'त्या' तरुणीवर हत्येपूर्वी बलात्कार; दोघा सख्ख्या भावांना अटक