ठाणे- मीरा भाईंदर प्रभाग अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अखेर पाच दिवसानंतर काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चार मुख्य आरोपी असून ३५ अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ चे अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांना रविवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर व्हिडिओ काढून मारहाण केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दिले होते. परंतु पाच दिवस उलटले तरी गुन्हा दाखल होत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यानी विरोध दर्शवला होता. त्यामुळे अखेर कलम 143, 147, 149, 341, 323, 504, 506अंतर्गत सुनील कदम, विकास फाळके, सचिन फोफळे,करण आणि ३५ अनोळखी व्यक्तीविरोधात काशीमिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शासकीय कामात अडथळा आला असल्यास तसा अहवाल पालिका प्रशासनाकडे मागितला असून त्या अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती काशीमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.