ठाणे - कालपासून सुरू असलेल्या पावसाने सकाळपासून रौद्र रूप धारण केले आहे. कल्याण तालुक्यात आत्तापर्यंत 2468 मि.मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या विक्रमी पावसामुळे कल्याण-डोंबिवली शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कल्याण व डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात तसेच शहरातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी शिरले आहे. शेकडो घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कल्याण-भिवंडी महामार्गावरही पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर आणि सुदर्शननगरमध्ये सततच्या पावसामुळे गेल्या आठवडाभर रस्त्यावर पाणी साचून राहिले आहे. नागरिकांना या पुराच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील बहुसंख्य शाळा आज सकाळपासूनच शाळा प्रशासनाने बंद ठेवल्या आहेत.
दरम्यान कल्याण-डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी नाल्यांतील पाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र निर्माल्य व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी नाल्यांतून पाणी पुढे जात नाही. नाल्यांत मच्छर, कीटक यांची पैदास वाढली असून साथीच्या आजारांचे प्रमाणही वाढले आहे.