ठाणे - गणपती बाप्पाचे सोमवारी घरोघरी आगमन झाले असून सर्वजण आपापल्या परीने बाप्पाच्या सेवेत मग्न झाले आहेत. सिने दिग्दर्शक रवी जाधव यांनी देखील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्यावरणपुरक आणि समाजोपयोगी गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.
पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता रवी जाधव यांनी घरीच शाडू मातीपासून गजाननाची मूर्ती साकारली आहे. तसेच या मूर्तीचे विसर्जन देखील घरीच करणार आहेत. एका पंचधातू गणेश मूर्तीचे पूजन करणार आल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच घरीच येणाऱ्या भाविकांना फुले, मोदक न आणता पैसे आपण ठेवलेल्या पेटीत टाकावे, असे आवाहन केले. जमा झालेले हे पैसे 'भरारी' या वृद्धाश्रमाला मदत म्हणून देणार असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा-रणवीर सिंगने शेअर केले गणपती बप्पाचे 'मराठी' रॅप गाणे!
त्यासोबतच लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरणाऱ्या कँसर विरोधात मदतनिधी उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर, सांगली आणि इतर भागातील पूरग्रस्तांना देखील या गणेशोत्सवाच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून त्यामाध्यमातून समाजोपयोगी कामे देखील केली गेली पाहिजेत, असा संदेश देत त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.