ठाणे - अंबरनाथ नगरपालिकेचा माजी उपनगराध्यक्षविरोधात ८ दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने तो राहत असलेल्या परिसरातील एका महिलेवर लॉकडाऊन काळात व त्यानंतर धान्य देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, दिवसभर पोलीस ठाण्यात बसलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी हा आठ दिवसांपूर्वी रात्री अचानक पोलीस स्टेशनमधून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेत आठ दिवसांनी पुन्हा त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सुनील वाघमारे असे आरोपीचे नाव असून तो सध्या भाजपचा पदाधिकारी आहे.
लॉकडाऊनच्या वेळी धान्य देण्याच्या बहाण्याने बलात्कार
पीडित महिला आरोपी सुनील वाघमारे यांच्या घरी लॉकडाऊनच्या काळात अन्न धान्य घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी संधीचा फायदा घेऊन त्याने आपल्याशी गैरवर्तन करून संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतरही दोन वेळा आरोपी वाघमारे याने आपल्याशी संबंध ठेवल्याचे महिलेचं म्हणणं आहे. घटनेनंतर काही दिवसांनी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार करायचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचं पीडितेने आपल्या अर्जात म्हटलं आहे. त्याचबरोबर याबाबत कुठेही वाच्यता केली तर वाघमारेने ठार मारण्याची धमकी दिली. अखेर आठ दिवसापूर्वी रात्री उशिरा सुनील वाघमारे याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता.
धक्कादायक बाब म्हणजे ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला होता, त्या दिवशी दुपारपासून पीडित महिला तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येऊन बसली होती. त्याचवेळी आरोपी सुनील वाघमारे याला चौकशीसाठी पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून बसवले होते. मात्र, रात्री अचानक सुनील वाघमारे पोलीस स्टेशनमधून पसार झाल्याने मोठा गोंधळ उडाला.
५ दिवसाची पोलीस कोठडी
पीडित महिलेवर लॉकडाऊनच्या काळात आरोपी सुनील वाघमारे याने बलात्कार केल्याचा आरोप होता. त्यानंतर, बंडखोरीच्या वादातून त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर वाघमारे याला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, गुन्हा दाखल होत असल्याचे लक्षात घेताच, त्याने पोलिसांना चकमा देत पळ काढला होता. आता ८ दिवसांनी पुन्हा पोलिसांच्या तावडीत सापडल्याने आज न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.