ठाणे - अभिनय आणि चित्रपट क्षेत्राकडे करिअर बघणाऱ्या तरुणांनी फोकस राहून काम करणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांनी डोंबिवलीत व्यक्त केले. 'डोंबिवलीकर-एक सांस्कृतिक परिवार'चा दशकपूर्ती सोहळा डोंबिवलीत आप्पा दातार चौकात रंगला. यावेळी आदर्श डोंबिवलीकर पुरस्कारांचे वितरणसुद्धा करण्यात आले. या सोहळ्याला रमेश देव यांच्यासह सीमा देव यादेखील उपस्थित होत्या.
सध्याची तरुण पिढी कामाबद्दल तितकीशी गंभीर दिसत नाही. मात्र, त्यांना अनेक माध्यम उपलब्ध होत आहेत. त्यामुळे त्यांनी एकाग्र असणे आवश्यक आहे. असे रमेश देव यावेळी म्हणाले. याचबरोबर रसिकांचे प्रेम हेच खरे टॉनिक असून या प्रेमाच्या जोरावर शंभरी नक्की गाठणार, असेही ते म्हणाले.

या सोहळ्यात ७० प्रतिभावंत डोंबिवलीकरांचा आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. डॉ. अजित ओक, सतीश मराठे, निलय घैसास, विनायक जोशी, ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे, सदाशिव तथा बापू वैद्य, मधुरा ओक, रिद्धी करकरे, मयुरेश साने, अतिश कुलकर्णी, यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ७० मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी डोंबिवलीकरचे संपादक तथा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, कार्यकारी संपादक प्रभू कापसे, सुधीर जोगळेकर, सुधाताई म्हैसकर, माधव जोशी आणि डोंबिवलीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरत दाभोळकर हे होते. दिग्दर्शक रवी जाधव आणि त्यांच्या 'रंपाट' चित्रपटाच्या टीमचीही विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभली होती. योगेश पाटकर, पवित्र भट, सुनिला पोतदार, सायली शिंदे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी यावेळी नृत्याविष्कार सादर केले. यावेळी रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीकरचा दहा वर्षांचा प्रवास मांडला. यापूढेही हा प्रवास सुरू राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'डोंबिवलीकर-एक सांस्कृतिक परिवाराने कटाक्षाने राजकारण दूर ठेवले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.