पनवेल - येथील मोहदर गावातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेने रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प तयार केला आहे. पनवेल तालुक्याच्या दक्षिणेला हाजीमलंग डोंगराच्या जवळ असलेल्या या शाळेत विद्यार्थी संख्या केवळ ३० इतकीच आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणारी ही पनवेल तालुक्यातील पहिलीच शाळा आहे.
पनवेलकरांना पाणीटंचाई तशी पाचवीला पूजलेली आहे. पावसाळ्यातील तीन ते चार महिने सोडले तर इतर महिने हे पनवेलकरांचे कोरडेच जातात. येथील काही भाग पाणीटंचाईला सामोरे जात आहे. तर काही भागात मात्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पाण्याचा उपयोग होत नाही. पनवेल शहरापासून जवळपास तेरा किलोमीटर अंतरावर वसलेल्या मोहदर गावात ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. पनवेल तालुक्याच्या दक्षिणेला हाजीमलंग डोंगराच्या जवळ असलेल्या या शाळेत विद्यार्थी संख्या केवळ ३० इतकीच आहे. पण या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे उच्चभ्रू सोसायटीतही अपयशी ठरलेला रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प या शाळेने यशस्वी करून दाखवला आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणारी ही पनवेल तालुक्यातील पहिलीच शाळा आहे. शाळेच्या एक हजार चौरस फूट छतावर पत्र्याचे छत तयार केले आहे. या छतावर जमा होणारे पाणी पाईपलाईनच्या मदतीने एका टाकीत सोडले जाते. या टाकीत पावसाचे पाणी शुद्ध करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हे पाणी पाइपद्वारे पाणी शुद्ध करणाऱ्या टाकीत सोडण्याची व्यवस्था केली आहे. पावसाळ्यात छतावरून आलेले पाणी बोअरवेल्समध्ये सोडण्यात आले आहे. साधारण सलग पाऊस असल्यास तासाला १५ हजार लिटर पाणी बोअरवेल्स परिसरात पडणार असल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणार असल्याचा विश्वास यंत्रणा बसविणाऱ्या कामगारांनी केला आहे.
तळोजा एमआयडीसीतील भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीने सीएसआर फंडाअंतर्गत या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे चार लाख रुपये खर्च या प्रकल्पासाठी आला आहे. यापूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे अनेक प्रकल्प राबविण्यात आले होते. उच्चभ्रू सोसायटीतही अपयशी ठरलेला रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या आर्थिक मदतीमुळे आणि शिक्षकांच्या इच्छाशक्तीमुळे यशस्वी झाल्याचे वर्गशिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.
भारत इलेक्ट्रिक कंपनीने याच शाळेत चार प्रशस्त शौचालये बांधून दिली आहेत. यापूर्वी लघुशंकेसाठी विद्यार्थ्यांना घरी जावे लागत होते. शौचालयामुळे त्यांचा मोठा प्रश्न सुटला आहे. शौचालयाची डागडुजी आणि स्वच्छता ठेवण्याची एक वर्षाची जबाबदारी कंपनीने घेतल्याने कंपनीचा माणूस दररोज शौचालयाची स्वच्छता करतो.