ठाणे - मेल, एक्स्प्रेस रेल्वेमधील वातानकुलीत डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली. लोहमार्ग पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली असून एका मेलच्या वातानुकुलीत डब्यातून त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून १५ लाखांचे दागिनेही हस्तगत करण्यात आले.
किरण शांताराम निबांळकर (वय ३५), असे बेड्या ठोकलेल्या चोरट्याचे नाव आहे. तो बुलडाणा जिल्ह्यातील साईबाबा वाडी येथील खामगावचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे हा चोरटा मोबाईल लोकेशनवरून पोलिसांच्या हाती लागला आहे.
गेल्या १ नोहेंबरला अमरावती एक्सप्रेसमधील वातानकुलीत डब्यात एका महिला प्रवाशाचे पर्स चोरीला गेले होते. त्या पर्समध्ये २ लाख ४५ हजार रुपयांचे दागिने होते. याप्रकरणी महिलेने लोहमार्ग पोलीस ठाण्यात दागिने चोरीची तक्रार दाखल केली होती. त्यांनतर पुन्हा ३ नोव्हेंबरला गरीब रथ एक्स्प्रेसमधील वातानकुलीत डब्यातील एका प्रवाशाचे १२ लाख ८० हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले होते. त्यावेळी त्या प्रवाशाने मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या चोरीमुळे रेल्वे पोलीस सतर्क झाले. त्यांनी जळगाव रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये एक संशयित चोरटा दिसला. त्यांनतर पोलीस उप निरीक्षक व्ही. एम. जाधव यांच्या पथकाने घराचा पत्ता व मोबाईल क्रमांक मिळविला. त्याचे मोबाईल लोकेशन मुंबई रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे दिसून आले. हा चोरटा पुन्हा विदर्भ एक्स्प्रेसमधील वातानकुलीत डब्बा क्रमांक २ मध्ये मुबंई-भुसावळ प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारण्यासाठी प्रवास करीत होता. यावेळी भुसावळ रेल्वेचे प्रहलाद सिंह यांच्या पथकाने आदीच सापळा लावला होता. त्यांनी वातानकुलीत डब्यातून आरोपी किरणला आरपीएफ आणि जीआरपीच्या पथकाने ताब्यात घेतले.
दरम्यान, या चोरट्याकडे लोहमार्ग पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने गरीब रथ आणि विदर्भ एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारण्याची कबुली दिली. त्यांनतर कल्याण, मनमाड, भुसावळ, पनवेल आरपीएफ आणि जीआरपीच्या पथकाने आरोपीकडून १५ लाखांचे दागिने हस्तगत केले.