नागपूर : नागपूरच्या एका पेट्रोल पंपावर झालेल्या किरकोळ वादानंतर टवाळखोर तरुणांच्या टोळक्यानं पेट्रोल पंप चालवणाऱ्या 44 वर्षीय महिलेला तरुणांच्या पायावर लोटांगण घालून सार्वजनिकरित्या माफी मागण्यास भाग पाडलं. इतकंच नाही तर पीडित महिलेची बदनामी करण्यासाठी तिचा हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन जणांना अटक केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? : 18 डिसेंबरच्या रात्री दहा वाजताच्या सुमारास नागपूर हिंगणा रोडवरील पेट्रोल पंपावर पीडित महिला उपस्थित होती. यावेळी पेट्रोल पंपावर काहीही काम नसताना दोन तरुण बाईकवरुन इकडं-तिकडं फिरु लागले. त्यामुळे पेट्रोल पंप संचालिका असलेल्या पीडित महिलेनं त्यांना हटकलं. या मुद्द्यावरुन वाद सुरू झाला. त्यानंतर टवाळखोर तरुणांनी आपल्या इतर साथीदारांनाही तिथं बोलावून घेतलं. यावेळी टवाळखोर तरुणांच्या टोळीनं पेट्रोल पंपावर गोंधळ घातला. तसंच महिलेला धक्काबुक्की केली.
पाय धरून माफी मागण्यास भाग पाडलं : रात्रीच्या वेळी एवढा मोठा जमाव आपल्या विरोधात पेट्रोल पंपावर आल्याचं बघून पीडित महिलेनं टवाळखोर तरुणांची माफी मागितली. मात्र, या टोळीचं नेतृत्व करणारा राजेश मिश्रा यानं त्याच्या पायावर लोटांगण घालून माफी मागावी लागेल असा हट्ट धरला. त्यामुळं पीडित महिलेनं पायावर लोटांगण घालत माफी मागितली. हा व्हिडिओ जमावातील काही टवाळखोर तरुणांनी महिलेचा सार्वजनिक अवमान करण्याच्या हेतूनं व्हायरल केला.
व्हिडिओ वायरल झाल्यानंतर आरोपींना अटक : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी तपास करत पोलिसांनी 19 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला. धमकावणे, शिवीगाळ करणे, विनयभंग करणे अशा विविध कलमान्वये राजेश मिश्रा आणि त्याच्या काही सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करत तिघांना अटकही करण्यात आली आहे.
हेही वाचा -