नवी मुंबई - रविवारी सकाळी रायगड जिल्ह्यातील दुबईला क्रिकेट स्पर्धेसाठी गेलेले खेळाडू भारतात दाखल झाले. भारतात इटली आणि दुबईवरून आलेल्या प्रवाशांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे उघड झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या खेळाडूंचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
हेही वाचा - दुबईतून ठाण्यात आलेला कोरोना संशयित मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल
पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये या सर्वांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या सर्वांना रिपोर्ट येईपर्यंत ग्रामविकास भवनमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांपैकी बहुतांशी लोक दुबईहून परत आलेले आहेत. त्यामुळे दुबईमध्ये कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या ठिकाणचा संसर्ग हा भारतातही पसरल्याचे ही दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दुबईहून परतलेल्या या खेळाडूंना या विषाणूची लागण झाली आहे का? याची तपासणी करण्यासाठी खेळाडूंना मुंबई विमानतळावरून थेट पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. दरम्यान, दुबईवरून आणखी काही खेळाडू परतणार असल्याची माहिती आहे. यासाठी पनवेल महानगरपालिका आणि उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.
हेही वाचा - लोकलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचा निनावी फोन, पनवेल स्टेशनसह रेल्वेची तपासणी