ठाणे: ठाणे जिल्ह्यातील १३४ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी (Gram Panchayat Election) आज सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत. निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार नशीब अजमावत असून ठाकरे गट व शिंदे गटातील सत्ता संघर्षानंतर (thackeray vs shinde) जिल्ह्यात प्रथमच निवडणूक होत असून १५८ पैकी ३१ सरपंच बिनविरोध निवडणून आले आहेत.
ठाकरे, शिंदे गटासह राष्ट्रवादी आणि भाजप या चारही राजकीय पक्षाचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. शिवाय १ हजार ४५३ सदस्यापैकी ४८७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ११९ सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असून सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार मैदानात असल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे.
7.30 ते 9.30 दरम्यान झालेले मतदान
मुरबाड तालुका ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका -
पुरुष | 3451 |
स्त्री | 1912 |
एकूण | 5363 |
टक्केवारी | 17.81% |
शहापूर आसनगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका -
पुरुष | 12921 |
स्त्री | 6873 |
एकूण | 19793 |
टक्केवारी | 13.59 % |
शहापूर तालुक्यात सर्वाधिक निवडणुका: जिल्ह्यातील तीन तालुक्यात प्रामख्याने ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. यापैकी शहापूर तालुक्यातील सर्वाधिक ७९ ग्रामपंचायती तर त्या खालोखाल मुरबाड तालुक्यातील ३५ व भिवंडी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. यापैकी भिवंडीत २ शहापूरात १३ तर मुरबाड मध्ये १० सरपंच बिनविरोध निवडणून आले आहेत.
सर्वच राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला: मुरबाडमध्ये भाजप आमदार किसन कथोरे यांचे वर्चस्व असून येथील सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आहेत. मात्र मुरबाडमध्ये शिंदे गटासह राष्ट्रवादीचे तगडे आव्हान भाजप समोर असेल. भिवंडी ग्रामीणमध्ये शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे असून या तालुक्यात भाजप, राष्ट्रवादीसह ठाकरे व शिंदे गटाचे वर्चस्व असल्याने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये चौरंगी लढती आहेत. मात्र सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असलेल्या शहापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा असून या तालुक्यात राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व शिंदे गटा शिवाय भारतीय कम्युनिस्ट पक्षाचेही काही भागात वर्चस्व असल्याने पंचरंगी लढती होणार आहे. तर मनसेचे उमेदवारही अनेक ग्रामपंचायतीमध्ये लढत देत आहेत. यामुळे सर्वच राजकीय नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ७९, कल्याण ७, अंबरनाथ १, ठाणे ५, भिवंडी ३१, मुरबाड ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यापैकी जिल्ह्यात १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ठाणे तालुक्यातील पाच ग्रामपंचायत निवडणुकीत बहिष्कार घातला आहे. तर २० ग्रामपंचायतीमधून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने या ठिकाणी निवडणुका होणार नाहीत. जिल्ह्यातील १३४ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदान सुरु असून जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ६८५ मतदार आपला हक्क बजावणार आहे. यासाठी ४५९ मतदान केंद्रवर मतदान सुरु असून जिल्ह्याभरातील ८५५ सदस्य व ११९ थेट सरपंच पदासाठी आज मतदान होत आहे.