ठाणे : खासगी शाळेकडून विद्यार्थ्यांकडे फीसाठी खूप तगादा लावला जातो. शिवाय खासगी शाळा मुलांना शिकवण्यासाठी पालकांकडून भरसाठ फी आकारत असतात. दरम्यान ठाण्यात फी न दिल्यामुळे खासगी शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यांना एक अनोखी शिक्षा केली. या शिक्षेमुळे करणं शिक्षिकेला आपली नोकरी गमवावी लागली आहे. शाळेच्या व्यवस्थापकांनी शिक्षिकेला निलंबित केले आहे. काय आहे हा सर्वप्रकार जाणून घेऊ...
30 वेळा लिहायला लावली टीप : याप्रकरणाची अधिकची माहिती अशी की, 19 एप्रिल रोजी खासगी शाळेतील सहावीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना फी संदर्भात एक नोट लिहिण्यास सांगितली होती. 'मी उद्या फी आणण्याचे विसरणार नाही', अशी टीप विद्यार्थ्यांना तीसवेळा आपल्या वहीत लिहिण्यास सांगितले. शिक्षिकेने विद्यार्थ्यांना लिहायला लावलेली ही टीप सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. व्हायरल झालेली ही नोट काही पालकांकडे सोशल मीडियाद्वारे पोहोचली. ही नोट घेऊन पालकांनी यासंदर्भात एक मोर्चादेखील काढला होता. याप्रकरणी ठाणे महानगरपालिकेने गंभीर दखल घेतली. महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना शाळेला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
शिक्षिकेचे निलंबन : शिक्षणाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी केली असता शाळा व्यवस्थापनाने शिक्षिकेला निलंबित केले असल्याचे ठाणे महानगरपालिकेने शनिवारी जाहीर केलेल्या आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या शिक्षिकेवर योग्य कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शाळेला दिले. तसेच भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी शाळेला समज देण्यात आली आहे. दरम्यान संबंधित शाळा या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. विद्यार्थ्यांवर अशाप्रकारचे दबाव टाकणे चुकीचे असल्याचे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर म्हणाले. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत, शालेय विद्यार्थ्यांना भावनिक किंवा शारीरिक छळाचा सामना करावा लागतो अशा परिस्थिती निर्माण करण्यास मनाई आहे, दरम्यान अशा परिस्थितीचा मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होत असतो. शाळांनी याबाबत जागरुक राहण्याची गरज आहे, असेही त्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे.