ठाणे- कल्याण पूर्वला पश्चिमेस जोडण्यासाठी महत्त्वाचा असणाऱ्या पत्री पुलाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरूच आहे. नवीन पुलाच्या कामाला होत असलेल्या विलंबामुळे जागरूक नागरिकांनी प्रशासनाविरोधात भीक मागो आंदोलन केले.
जिल्हा पत्रीपूल बंद होऊन आता जवळपास दहा महिने लोटले आहेत. मात्र नवीन पुलाच्या कामाचे अद्याप १ टक्काही काम पूर्ण झाले नसून वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचे सांगत ब्रिटिश कालीन पत्रीपूल गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बंद करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल चार महिन्यांनी, म्हणजे ३० डिसेंबर २०१८ ला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन पुलाच्या कामाचे थाटामाटात भूमिपूजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुढील आठवड्यात नवीन पूल बांधून तयार होईल, असा दावाही त्यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्षात जानेवारी ते मे पर्यंत ५ टक्केही काम पूर्ण होऊ शकले नाही.
पत्रीपुलाच्या ढिसाळ कामामुळे दररोज हजारो लोकांना वाहतूक कोंडीचा फटका बसतो आहे. दररोज हजारो रुपयांच्या इंधनाची नासाडी होत आहे. त्यासोबतच वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या प्रदूषणाने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिक व्यापाऱ्यांचाही यामूळे नुकसान होत आहे. प्रशासनाच्या ढिसाळपणाचे निषेध करण्यासाठी स्थानिक जागृत नागरिकांनी आज पत्रीपूल परिसरात भीक मांगो आंदोलन केले. आंदोलनादरम्यान जमा झालेले पैसे आपण शासनाला पाठविणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते शकील खान यांनी दिली. तसेच लवकरात लवकर या पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणीही स्थानिक नागरिकांनी केली.