ठाणे - शेतात काम करणाऱ्या शेतमजूरालाही रोजगार हमीतून पगार दिला जावा, असा प्रस्ताव विचाराधीन असून तो मांडला जाणार असल्याचे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. डोंबिवली मध्यवर्ती सहकारी भांडार संस्थेच्या अमृतोत्सव कार्यक्रम प्रसंगी पाटील बोलत होते.
डोंबिवली मध्यवर्ती सहकारी भांडार संस्थेचा अमृतोत्सव कार्यक्रम डोंबिवली पूर्वेकडील ब्राम्हण सभा हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, मध्यवर्ती भांडार संस्थेचे अध्यक्ष प्रसाद गोगटे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारींसह आदी मान्यवर उपस्थित होते.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, शेतकरी सावकारांकडून कर्ज घेतो. त्यामुळे कर्जाच्या बोज्याखाली दबल्याने शेतकरी कर्जाच्या दृष्ट चक्रात अडकला आहे. त्याला त्यातून बाहेर काढून त्याला बी बियाणो खरेदी करण्यासाठी पैसा हवा आहे. त्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले आहेत. पंतप्रधान मोदी ही रक्कम पुढील काळात वाढवतील, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.