ठाणे - मुंबईप्रमाणे येथेही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज अनेकजण इस्पितळात भर्ती केले जात आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाबाधितांवर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात बेड्स कमी पडू लागले आहेत. यामुळे अनेकांना खासगी रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. मात्र, या रुग्णांच्या उपचारासाठी लाखो रुपयांची बिले दिली जात असल्याने संतापलेल्या मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी गंभीर असलेले पेशंट्स सोडून, दिवसभरात बाकी सर्वाना काहीं गोळ्या दिल्या जातात. त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही महागडे उपचार केले जात नसताना देखील सव्वा ते दीड लाखांची बिले देण्यामागे काय गौडबंगाल आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासर्व प्रकारात काय भ्रष्टाचार आहे का ? याची चौकशी महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. सध्याच्या परिस्थितीत लोकांचा रोजगार मिळणे थांबले आहेत. अशा परिस्थितीत खाजगी डॉक्टरांचे या महागड्या बिलांचे पैशे कुठून भरायचे हा सवालही केला. म्हणून कोरोनाबाधितांची सरकारी रूग्णालयांमध्येच उत्तम दर्जाची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
हेही वाचा - कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नासाने बनवलं अल्प दरात व्हेंटिलेटर