ठाणे - कोरोनाचा संसर्ग झालेल्या मध्यवर्गीय रुग्णांना माफक दरात उपचार मिळण्यासाठी महापालिकेने ठरविलेले दर ठाण्यातील खाजगी रुग्णालयांनी फेटाळले आहेत. कोरोनाच्या रुग्णाला दररोज किमान १२ हजार ५०० चा भूर्दंड बसत आहे. ४ हजार ५०० हजार बेड चार्ज, ३ हजार ६५० रुपयांचे पीपीई कीट आणि मास्क, २ हजार ५०० डॉक्टर फी यांच्यासह औषधे आणि चाचण्यांसाठी दररोज १२ हजार ५०० रुपये आकारले जात आहेत. या प्रकाराबद्दल भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी संताप व्यक्त केला असून, महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे संबंधित रुग्णालयांवर कारवाईची मागणी केली आहे.
अमरावतीहून ठाण्यातील निवासस्थानी परतलेल्या एका ७१ वर्षांच्या वृद्धाची सतर्कता म्हणून, नौपाडा येथील खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्यांना घाईघाईत घोडबंदर रोडवरील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. ते मध्यमवर्गीय असल्यामुळे कुटुंबियांनी सामान्य कक्षाची मागणी केली होती. मात्र, कोरोनासाठी केवळ आयसीयू व एचडीयू युनिट आहेत. सामान्य कक्ष अस्तित्वातच नाही, असे खाजगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना एचडीयू (हाय डिफेडन्सी यूनिट) कक्षात दाखल करण्यात आले. तेथील रुममध्ये ६ ते ७ रुग्णांना ठेवण्यात आले असल्याचे रुग्णाचे म्हणणे आहे. तेथे त्यांच्यावर ८ दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याची कार्यवाही सुरू करण्यात
आली. डिस्चार्जआधी त्यांनी पुन्हा कोरोना चाचणीचा आग्रह धरला. मात्र, त्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करीत तब्बल एक लाख एक हजार १३९ रुपयांचे बिल हाती सोपविण्यात आले. या बिलाने रुग्णासह कुटुंबियांनाही धक्का बसला. स्पेशल वॉर्ड वा आयसीयूमध्ये दाखल नसतानाही, दररोज साडेबारा हजार रुपयांप्रमाणे बिल कसे आले, असा या रुग्णाचा सवाल आहे. आपली कैफियत त्यांनी नगरसेवक नारायण पवार यांना सांगितली.
संबंधित रुग्णालयाने बेड (रुमभाडे) चार्जेस - ४५०० रुपये, डॉक्टर व्हीजीट - २००० रुपये, रेसिडेन्शियल डॉक्टर व्हीजीट (आरएमओ) - ५०० रुपये, पीपीई कीट, सर्जिकल ग्लोव्हज्, एन-९५ मास्क, फेस शिल्ड, अॅप्रन आदींसाठी - ३६७५ रुपये आणि सर्व्हीस चार्जेस - ५०० रुपये असे दररोज ११ हजार १७५ रुपये आकारले आहेत. तर उर्वरित रक्कम औषधे व चाचण्यांसाठी आकारण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी ३० एप्रिल रोजी होरायझॉन प्राईम, वेदांत आणि कौशल्या रुग्णालयाच्या संचालकांबरोबर बैठक घेतली होती. त्यावेळी पिवळे-केशरी रेशनकार्डधारक यांच्यासह मध्यम उत्पन्न गटातील रुग्ण दाखल झाल्यास सवलतीचे दर लागू करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार जनरल वॉर्डसाठी प्रतिदिन ४ हजार रुपये (बेड चार्जेस, डॉक्टर व्हीजीट, नर्सिंग चार्जेस, पीपीई कीट्स व जेवणाचा खर्च समाविष्ट, औषधे व सर्जिकल साहित्याच्या खर्चाला बाजारभावापेक्षा १५ टक्के कमी दराने आकारणी), ट्वीन शेअरिंग रुमसाठी ५ हजार रुपये, सिंगल रुमसाठी ७ हजार रुपये आणि आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णांसाठी १० हजार रुपये दर निश्चित करण्यात आले होते.
त्याचबरोबर व्हेंटिलेटर आवश्यक असलेल्या रुग्णांसाठी २ हजार रुपये अतिरिक्त आकारण्यात येणार होते. मात्र, प्रत्यक्षात या आदेशाला रुग्णालय व्यवस्थापनाकडून `वाटाण्याच्या अक्षता' लावण्यात आल्या आहेत. खाजगी रुग्णालयात सामान्य कक्षच उभारण्यात आलेला नाही. पालिकेचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे अवाच्या सवा दर आकारुन रुग्णांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांनी केला.
या प्रकाराची गंभीर दखल घेऊन घोडबंदर येथील संबंधित रुग्णालयावर कारवाई करावी. तसेच सर्व खाजगी रुग्णालयांमधील कारभाराची चौकशी करुन ठाणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी नारायण पवार यांनी आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.