नवी मुंबई (ठाणे) - नवी मुंबई येथील मनसेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देताच रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलला महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी चांगलाच दणका दिला आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी दणका देताच शहरातील खाजगी हॉस्पिटलांनी रुग्णांकडून कोरोना उपचाराच्या नावाखाली जादा आकारलेल्या बिलाचे पैसे रुग्णांना परत देण्यास सुरुवात केली आहे.
पी.के.सी हॉस्पिटल (वाशी), एम.पी.सी.टी हॉस्पिटल (सानपाडा), एम.जी.एम.हॉस्पिटल (बेलापूर), फोरटीज हॉस्पिटल (वाशी), डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल (नेरुळ), रिलायन्स हॉस्पिटल (कोपरखैरणे), अपोलो हॉस्पिटल (बेलापूर), ग्लोबल हॉस्पिटल (वाशी), राजपाल हॉस्पिटल (कोपरखैरणे), तेरणा हॉस्पिटल (नेरुळ) तसेच सनशाईन हॉस्पिटल (नेरुळ) या हॉस्पिटलांनी रुग्णांकडून ज्यादा आकारलेले बिलाचे एकूण ३२ लाख रुपये आतापर्यंत परत केले. याबाबत महापालिकेने मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
कोविड काळात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलच्या आतापर्यंतच्या संपूर्ण बिलांची पडताळणी करण्यासाठी विशेष लेखा परिक्षण पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके सात दिवसांत हॉस्पिटलच्या बिलांच्या तक्रारीबाबत पडताळणी करून ज्यादा आकारलेल्या बिलांचे पैसे परत करणे, दोषी हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करणे अथवा हॉस्पिटलची मान्यता निलंबित करण्याबाबतची आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिकेने मनसेला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
मनसेच्या निवेदनानंतर रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलच्या विरोधात तक्रार करण्यासाठी ०२२ - २७५६७३८९ हा हेल्पलाईन नंबर तसेच ७२०८४९००१० हा व्हॉटसअप नंबर सुरू केला आहे. शहरात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे. मात्र, या खासगी हॉस्पिटलकडून कोरोना उपचाराच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक लूट होत अनेकदा तक्रारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना ४ सप्टेंबरला भेटून लेखी निवेदन दिले होते.
मनसेचा हा मोठा विजय असून जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा खासगी हॉस्पिटलच्या लूटमारी विरोधातला लढा सुरूच राहिल. तूर्तास आम्ही आयुक्त अभिजित बांगर यांच्या विनंतीवरून आमचे आंदोलन स्थगित करित आहोत. असे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले. रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलवर ठोस कारवाई करण्याची मागणी मनसेच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली होती. सात दिवसांत ठोस कारवाई झाली नाही तर खाजगी हॉस्पिटलचे तारणहार म्हणून आयुक्तांना पुरस्कार देण्याचा इशारा मनसेने दिला होता. मात्र, आयुक्तांनी कारवाई केल्यामुळे रुग्णालयांना 32 लाख रुपये परत करावे लागले आहेत.