ठाणे : फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा ठोठावताच आक्रमक झालेल्या खून खटल्यातील माथेफिरू आरोपी सरकारी वकिलावर हल्ला करत असल्याच्या अनेक घटना पाहावयास मिळतात. अशीच एक घटना कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान घडली. आकाश राजू तावडे असे हल्लेखोर कैद्याचे नाव आहे. तर योगेंद्र पाटील (वय ४२ वर्षे) असे सरकारी वकिलाचे नाव आहे.
तावडे रिक्षा चालकाच्या हत्येप्रकरणी अटकेत
हल्लेखोर कैदी आकाश राजू तावडे हा कल्याण-मुरबाड रोडवरच्या म्हारळ गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. एका रिक्षा चालकाची हत्या केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात 302 अनव्ये गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी आकाश तावडेला अटक केली आहे. त्याच्यावर कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात खुनाचा खटला सुरू आहे.
शिक्षा सुनावताच निकाल ऐकून तावडे संतापला अन्...
या खटल्याची बुधवारी अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय (तिसरे) यांच्या न्यायालयात सुरू होती. न्यायाधीशांनी आरोपी आकाश तावडे याला या गुन्ह्यात दोषी ठरवून शिक्षा सुनावली. हा निकाल ऐकताच आकाश संतापला. त्याने साक्षीदारांच्या कठड्यातून बाहेर येऊन अतिरिक्त सरकारी अभियोक्ता योगेंद्र पाटील यांच्या डोक्यावर मारहाण केली. 'हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, तुला खल्लास करेन, मी वाघाचा बच्चा आहे', अशी धमकी देऊन त्याने सरकारी वकिल पाटील यांना शिवीगाळी केली. पोलिसांनी वेळीच आवरल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता योगेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी हल्लेखोर कैदी आकाश तावडे याच्या विरोधात भादंवि कलम 353, 332, 504, 506 अनव्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून त्याची अधिक चौकशी सुरू आहे.
दिल्लीतही न्यायालयात गुंडांचा वकिलाच्या वेशात येऊन गोळीबार, 3 मृत्यू
नवी दिल्लीतील अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या रोहिणी न्यायालय परिसरात पुन्हा गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारी कुख्यात गुन्हेगार जितेंद्र उर्फ गोगी याला न्यायालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी वकिलाच्या वेशामध्ये आलेल्या दोन जणांनी त्याच्यावर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देतांना विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांनीही गोळीबार केला यामध्ये दोन हल्लेखोरांसोबत गुन्हेगार गोगी याचाही मृत्यू झाला आहे. पाहा व्हिडिओ
हेही वाचा - ज्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले त्यांचा निर्णय जनतेच्या कोर्टात होईल; मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
हेही वाचा - राखा को पकड कर दिखा दो..., पोलिसांना चॅलेंज देणाऱ्या कुख्यात गुंडाला नागपुरात अटक