ठाणे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर आघाडी सरकारमधील नेते टीका करत आहेत. शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपाच्या नेत्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राज्यपालपदी बसलेल्या व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार जात-पात धर्म बाजूला सारून काम केले पाहिजे, असे सरनाईक म्हणाले.
मंदिरे सुरू करण्यासाठी राज्यभर भाजपा नेते आंदोलन करत आहे. त्यामागे त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. त्यामुळे त्यांचे आंदोलनही मला संशयास्पद वाटते. मदिरेची तुलना मंदिराशी करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नदेखील सरनाईक यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त हिंदू जनतेचे मुख्यमंत्री नाहीत. राज्यातील सर्व धर्मीय जनतेची त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना सर्वांच्या प्रार्थनास्थळांचा विचार करावा लागेल, असेही सरनाईक म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहित त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्या हिंदुत्वाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.